आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याचा प्रश्न संसदेत उपस्थित व्हावा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2017/03/324261-274398-farmer-suicide.jpg)
केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांची सूचना
बँकेच्या कर्जाची परतफेड करू न शकल्याने आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याबाबतचा प्रश्न संसदेमध्ये उपस्थित करण्याची गरज आहे, असे मत केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी व्यक्त केले आहे.
वाणिज्यिक बँकांकडून शेतकऱ्यांनी घेतलेल्या कृषीकर्जाबाबत केंद्र सरकारने भूमिका घेण्याची गरज आहे, असे विजयन यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी लिहिलेल्या पत्राला उत्तर देताना म्हटले आहे. या पत्राची प्रत माध्यमांच्या प्रतिनिधींना देण्यात आली आहे.वाढत्या कर्जामुळे आणि कर्जाची परतफेड करणे अशक्य होत असल्याने देशातील शेतकरी बेजार झाला आहे त्यामुळे हा प्रश्न संसदेमध्येच उपस्थित करण्याची गरज आहे, त्यासाठी तुम्ही आम्हाला मदत कराल, अशी अपेक्षा आहे असे विजयन यांनी म्हटले आहे.
केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून राहुल गांधी निवडून आले आहेत. वायनाडमधील शेतकरी व्ही. डी. दिनेशन यांनी कर्जबाजारी झाल्याने आत्महत्या केली त्यांच्या कुटुंबीयांना मदत देण्याची विनंती गांधी यांनी राज्य सरकारकडे केली आहे. वाणिज्यिक बँकाकडून घेतलेल्या कर्जाचा प्रश्न ‘एसएआरएफएईएसआय’ कायद्याखाली येत असल्याने शेतकऱ्यांच्या कर्जाबाबत केंद्र सरकारने सारासार विचार करून भूमिका घेतली पाहिजे, असे विजयन यांनी म्हटले आहे.