breaking-newsराष्ट्रिय

आता तरी संघटना मजबूत करा!

राहुल गांधींचा राज्यातील नेत्यांना सल्ला

लोकसभेची निवडणूक हरलो पण, आता विधानसभा निवडणुकीसाठी तरी संघटना मजबूत करा. राष्ट्रवादी काँग्रेस आणि अन्य मित्रपक्षांशी राज्य स्तरावर जागावाटपाची चर्चा सुरू करा, असा सल्ला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना दिला आहे. राहुल गांधी यांनी शनिवारी संध्याकाळी सुमारे दोन तास दोन वेगवेगळ्या गटांमध्ये प्रदेश काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा केली.

लोकसभा निवडणुकीत प्रदेश काँग्रेसला मोठे अपयश पत्करावे लागले असले आणि पक्ष संघटना कमकुवत झाली असली तरी आता नव्या उमेदीने काम करावे लागणार आहे. काँग्रेसचा नवा अध्यक्ष लवकरात लवकर निवडला जाईल अशी अपेक्षा आहे. राज्यात विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असून आपल्यामुळे प्रदेश स्तरावर पक्षनेत्यांची आणि कार्यकर्त्यांची अडचण होऊ नये यासाठी बैठका घेत असल्याचे राहुल यांनी पक्षनेत्यांना सांगितले. महाराष्ट्रासह, झारखंड, हरियाणा, दिल्ली या राज्यांमध्येही विधानसभेच्या निवडणुका होणार असून अन्य तीनही राज्यांतील नेत्यांशी राहुल यांनी चर्चा केली आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी राहुल गांधी यांना राजीनामा मागे घेण्याची विनंती केली. पण, आता हा विषय संपलेला असून त्यावर चर्चा केली जाणार नाही. काँग्रेस कार्यकारिणीची बैठक होणार असून सदस्य पुढील निर्णय घेतील, असे राहुल यांनी सांगितले. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, पृथ्वीराज चव्हाण, हर्षवर्धन पाटील, विजय वडेट्टीवार, वर्षां गायकवाड, रजनी पाटील, राजीव सातव, अमित देशमुख, माणिकराव ठाकरे आदी नेते बैठकीला उपस्थित होते.

नाना पटोले यांचा राजीनामा

काँग्रेसमध्ये पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याचे सत्र सुरूच असून किसान काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी पदाचा राजीनामा दिला. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून पटोले यांनी राजीनामा दिला आहे. राहुल गांधी यांनी अध्यक्षपदावर कायम राहावे आणि पक्षसंघटना मजबूत करावी यासाठी अनेक पदाधिकारी राजीनामा देत आहेत. गोवा, तेलंगण, हरयाणा, कर्नाटक, मध्य प्रदेश या राज्यांतील सुमारे दीडशे पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button