Breaking-news
आणखी चार राज्यांत विरोधकांचा सत्तेचा दावा

नवी दिल्ली : कर्नाटकात सर्वांत मोठा पक्ष असलेल्या भाजपाला सत्ता स्थापनेसाठी बोलावल्यामुळे ज्या राज्यांत भाजपापेक्षा विरोधक आमदारांची संख्या अधिक आहे, त्यांनीही सत्ता स्थापनेची संधी द्या, अशी पत्रे राज्यपालांना द्यायचे ठरवले आहे. गोव्यात विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी राज्यपालांची भेट मागितली, तर बिहारमध्ये राजद राज्यपालांना भेटून तसा दावा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मणिपूर व मिझोरममध्येही सर्वाधिक आमदार असलेला काँग्रेस पक्ष राज्यपालांना भेटून सरकार स्थापनेचा दावा करेल.
हा प्रतीकात्मक आंदोलनाचा भाग आहे. जिथे सरकार अस्तित्वात आहे, तिथे ते पडल्याशिवाय अन्य पक्षाला राज्यपालांकडे असा दावा करताच येत नाही. विधानसभेत अविश्वासाचा ठराव मांडणे व संमत होणे ही प्रक्रिया पूर्ण झाली, तरच अन्य पक्ष सरकार स्थापनेसाठी दावा करू शकतात.




