आंतरजातीय विवाह केल्याने पोटच्या मुलीची हत्या, मृतदेह जाळून अस्थी दिल्या फेकून
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/Telangana-Caste-Marriage.jpg)
तेलंगणात ऑनर किलिंगचा प्रकार समोर आला आहे. आंतरजातीय विवाह केल्याने आई-वडिलांनीच 20 वर्षीय मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हैदराबादपासून 250 किमी अंतरावर असणाऱ्या मंचेरिअल जिल्ह्यातील कलमाडुगू गावात हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पी अनुराधा असं तरुणीचं नाव आहे. तिच्या आई-वडिलांनी नातेवाईकांच्या मदतीने तिची हत्या केली. इतकंच नाही तर हत्या केल्यानंतर मुलीचा मृतदेह जाळून टाकला आणि तिच्या अस्थी वाहत्या पाण्यात फेकून दिल्या.
आरोपी वडिलाचं नाव सत्तेन्ना असून आईचं नाव लक्ष्मी आहे. मुलीने कनिष्ठ जातीतील तरुणाशी लग्न केल्याने दोघं नाराज होते. याच रागातून त्यांनी पोटच्या मुलीची हत्या केली. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. शनिवारी रात्रीच अनुराधाची हत्या करण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी तिचा पती लक्ष्मण याने पोलीस ठाण्यात तक्रार केली असता हा प्रकार उघडकीस आला.
लक्ष्मण आणि अनुराधा एकाच गावातील रहिवासी होते. दोघांचंही एकमेकांवर प्रेम होतं. अनुराधाच्या कुटुंबाचा लग्नाला विरोध असल्याने दोघेही घरातून हैदराबादला पळून गेले होते. तेथील आर्य समाज मंदिरात दोघांनी 3 डिसेंबरला लग्न केलं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
20 दिवसांनी लक्ष्मण आणि अनुराधा पुन्हा आपल्या गावी पोहोचले. याची माहिती मिळताच अनुराधाच्या कुटुंबीयांनी लक्ष्मणच्या घरावर हल्ला केला आणि जबरदस्ती अनुराधाला घेऊन गेले. तपासादरम्यान, आई वडिल तिला निर्मल जिल्ह्यातील मल्लापूर गावात घेऊन गेले आणि हत्या केली असं समोर आलं. हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी मृतदेह जाळला आणि अस्थी पाण्यात फेकून दिल्या.