अवाढव्य खर्चाचे कारण देऊन अमेरिका व द.कोरिया संयुक्त लष्करी सराव रद्द
वॉशिंग्टन – अवाढव्य खर्चाचे कारण देऊन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांच्यातील संभाव्य संयुक्त लष्करी सराव रद्द करण्याची घोषणा केली आहे. या सरावावर 14 दशलक्ष डॉलर्स इतका खर्च अपेक्षित होता असे पेंटॅगॉनने म्हटले आहे. हा संयुक्त सराव येत्या ऑगस्ट महिन्यात होणार होता. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे प्रमुख किम जोंग यांच्यात सिंगापुर येथे नुकतीच बोलणी झाली आहेत. या चर्चेतून विधायक वातावरण तयार झाल्याने ही संयुक्त लष्करी सरावाची प्रक्रिया रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात येते. या सरावाला उत्तर कोरियाचा आक्षेप होता.
युद्धाचे खेळ आता थांबवायला हवेत. त्यातून मोठेच नुकसान टाळता येऊ शकते. त्यामुळे जो पर्यंत उत्तर कोरिया चर्चेच्या माध्यमातून विविध समस्यांवर तोडगा काढण्यास तयार आहे तो पर्यंत अशा लष्करी खर्चिक सरावांची गरज नाहीं असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. अमेरिकेच्या लष्करी मुख्यालयाचा खर्च सुमारे 700 अब्ज डॉलर्स इतका असतो. त्याच्या तुलनेत 14 दशलक्ष डॉलर्स ही रक्कम कमी असली तरी ती थोडीथोडकी नाही हेही लक्षात घ्यावे लागेल असेही ट्रम्प यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे.
अमेरिकेचे सुमारे 28500 लष्करी जवान आणि अधिकारी दक्षिण कोरियात तैनात आहेत. त्यांना नियमीत युद्ध सराव देण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणूनही हा संयुक्त लष्करी सराव दक्षिण कोरियात आयोजित करण्यात येणार होता. पण त्यातून वातावरण खराब होऊ नये म्हणून ही उपाययोजना करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.