अल-कायदाचा दहशतवादी झाकीर मुसा शिखाच्या वेशात पंजाबमध्ये
काश्मिरी दहशतवादी झाकीर मुसा पंजाबमध्ये लपून बसल्याची गोपनीय माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर बटिंडा आणि फिरोजपूर जिल्ह्यात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुसा शिखाच्या वेशात असू शकतो. तो अन्सार गजवत उल हिंद (अल कायदाशी संलग्नित) या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आहे. हा दहशतवादी समूह आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांशी संबंधित आहे.
लष्कराचे जवान, पंजाब पोलीस आणि इतर अर्धसैनिक दलांना बठिंडा रेल्वे स्थानकासारख्या महत्वाच्या आणि त्या परिसरातील विविध ठिकाणी तैनात करण्यात आले आहे. गुरुवारी सकाळीच तपास सुरु करण्यात आला आहे. जागो-जागी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. सर्वांची कसून तपासणी केली जात आहे.
दोन्ही जिल्ह्यातील नागरिकांना सतर्क राहण्यास सांगितले असून विविध ठिकाणी त्याची पोस्टर्सही लावण्यात आली आहेत. या पोस्टरमध्ये मुसा शिखाच्या वेशात दिसतोय.
तत्पूर्वी, नोव्हेंबरमध्येही पंजाबमधील गुरदासपूर आणि अमृतसरच्या सीमावर्ती जिल्ह्यात मुसा लपल्याची माहिती मिळाल्यानंतर पोस्टर्स लावण्यात आले होते. काश्मीर खोऱ्यात अल कायदाचा एक सेल, दहशतवादी संघटना अन्सार गजवत उल हिंदचा प्रमुख मुसाला पंजाब आणि तेथील स्थानिकांविषयी चांगली माहिती आहे.
मुसाने मोहालीतील एका खासगी आभियांत्रिकी महाविद्यालयात २०१० साली प्रवेश घेतला होता. परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यामुळे त्याने २०१३ मध्ये हे शिक्षण सोडून दिले होते. पंजाबमध्ये त्याचे चांगले नेटवर्क आहे.