अमेरिकेने इराणवर आक्रमण केल्यास गंभीर परिणाम
- इराणच्या लष्करी अधिकाऱ्याचा इशारा
इराणविरोधात जर अमेरिकेने कुठलेही आक्रमण केले तर त्याचे प्रादेशिक पातळीवर गंभीर परिणाम होतील, तसेच मध्यपूर्वेतील अमेरिकी हितसंबंधांना बाधा पोहोचेल, असा इशारा इराणने दिला आहे. इराणचे ब्रिगेडियर जनरल अबोलफजल शेखार्ची यांनी तनसनिम न्यूजला सांगितले की, इराणवर एक गोळी झाडली गेली तरी त्याचे अमेरिका व मित्र देशांच्या हितसंबंधांना गंभीर परिणाम भोगावे लागतील. सध्या तरी येथील परिस्थिती इराणच्या फायद्याची आहे. जर अमेरिका किंवा मित्र देशांनी आगळिक करून आक्रमण करून गोळीबार केला तर या प्रदेशात संघर्षांची आग भडकेल.
इराणने अमेरिकेचे गुप्तहेर विमान पाडल्यानंतर अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हल्ल्याचे आदेश दिले होते पण त्यात दीडशे लोक मरतील असे सांगण्यात आल्यानंतर हे आदेश दहा मिनिटांतच मागे घेण्यात आले. अमेरिकेच्या ड्रोन विमानाने हवाई हद्दीचा भंग केला होता असे इराणचे म्हणणे असून अमेरिकेने हा आरोप फेटाळला आहे. याआधी दोन तेल टँकरवर हल्ले करण्यात आले होते. त्याला इराण जबाबदार असल्याचा अमेरिकेचा आरोप आहे.
भारतीय विमानांना इराणची हद्द टाळण्याची सूचना
नवी दिल्ली : ओमानच्या आखातात तेलवाहू जहाजांवरील हल्ल्यांनंतर इराण आणि अमेरिका यांच्यातील राजकीय संबंध प्रचंड ताणले गेले आहेत. या तणावाच्या पाश्र्वभूमीवर इराणच्या हवाई हद्दीतील संभाव्य धोक्याचा प्रदेश वगळून इंडियन एअरलाईन्सने आपली हवाई वाहतूक सुरू ठेवावी. त्यासाठी या मार्गामध्ये योग्य तो बदल करावा, असे निर्देश भारताच्या नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने शनिवारी दिले आहेत. शुक्रवारी अमेरिकेच्या हवाई वाहतूक नियंत्रण प्रशासनानेही अमेरिकेत नोंदणी झालेल्या विमानांची वाहतूक इराणच्या हवाई क्षेत्रातून पुढील सूचना मिळेपर्यंत करू नये, असे बजावले आहे. त्यानंतर भारतानेही प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पाऊल उचलले आहे.