breaking-newsआंतरराष्टीय

अमेरिकेचे संरक्षण मंत्री जेम्स मॅटिस यांचा राजीनामा

अमेरिकेचे संरक्षण मंत्री जेम्स मॅटीस यांनी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेल्या मतभेदानंतर राजीनामा दिला आहे. भारत व अमेरिका लष्करी संबंधाचे ते खंदे पुरस्कर्ते होते. संघर्षग्रस्त सीरियातून अमेरिकी सैन्य माघारी घेण्याच्या ट्रम्प यांच्या निर्णयानंतर पेंटॅगॉनमध्ये सर्वानाच धक्का बसला होता. मॅटिस व ट्रम्प यांच्यात समेट न घडून येणारे मतभेद या धोरणबदलांवर झाले होते.

ट्रम्प प्रशासनातून सोडून जाणारे मॅटिस हे अलीकडच्या काळातील सर्वात मोठे अधिकारी आहेत. अध्यक्ष ट्रम्प यांना पाठवलेल्या पत्रात मॅटिस यांनी म्हटले आहे,की त्यांनी आता त्यांच्या जागतिक दृष्टिकोनाशी सुसंगत अशा व्यक्तीची नेमणूक करावी. मॅटिस यांनी राजीनामा दिल्याचे ट्रम्प यांनी गुरूवारीच दोन ट्विट संदेशातून सूचित केले होते. मॅटिस हे फेब्रुवारीअखेर पद सोडतील असेही त्यांनी त्यात म्हटले होते.

मॅटिस (वय६८) हे अमेरिकेतील निवृत्त मरीन कोअर जनरल असून ते गुरूवारी दुपारी ट्रम्प यांना सीरियात सैन्य कायम ठेवण्याची भूमिका पटवून देण्यासाठी व्हाइट हाऊसमध्ये गेले होते. पण अध्यक्षांनी त्यांची भूमिका फेटाळून लावली, त्या वेळी मॅटिस यांनी राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. गुरूवारच्या आणखी एका वृत्तानुसार अमेरिकी अध्यक्ष ट्रम्प हे अफगाणिस्तानातून सैन्य कमी करण्याच्या विचारात आहेत.

जागतिक प्रश्नांवर तुम्हाला सुसंगत मते असलेल्या व्यक्तीची नेमणूक करण्यास तुम्ही आता मोकळे आहात, असे मॅटिस यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे. पद सोडण्यासाठी मला हीच वेळ योग्य वाटत असून २८ फेब्रुवारी २०१९ पर्यंत माझी मुदत राहील, तेवढा वेळ उत्तराधिकारी निवडण्यास पुरेसा आहे.

सैन्य माघारीच्या मुद्दय़ावरून राजीनामा देत आहे, असे मॅटिस यांनी स्पष्टपणे म्हटलेले नाही. मॅटिस हे भारत अमेरिका संरक्षण संबंधाचे खंदे पुरस्कर्ते होते व त्यांनी चीन इंडो -पॅसिफिक भागात बाहू फैलावत असताना भारताला महत्त्व दिले होते. मॅटिस यांनी संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्याशी नुकतीच भारत अमेरिका संरक्षण संबंधावर चर्चाही केली होती. सप्टेंबरमध्ये दोन अधिक दोन संवादाच्या वेळी ते भारतात आले होते. एस ४०० क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली रशियाकडून घेण्यासाठी भारताला र्निबधातून सूट देण्यात यावी, असे आवाहन मॅटिस यांनी काँग्रेसला केले होते. मॅटिस यांच्या राजीनाम्यावर ट्रम्प यांनी सांगितले,की जनरल जिम मॅटिस हे फेब्रुवारी अखेर निवृत्त होत आहे. त्यांनी दोन वर्षे संरक्षण मंत्री म्हणून काम केले. त्यांच्या काळात बरीच प्रगती झाली. नवीन संरक्षण मंत्र्यांची नेमणूक लवकरच करण्यात येईल.

सीरियातून अमेरिकी सैन्याची माघार ही अमेरिकेच्या शत्रू राष्ट्रांना खूश करणारी असून सीरियातील बशर अल असाद राजवटीला त्यामुळे मोकळे रान मिळणार आहे. रशिया व इराण यांचाही फायदा होणार आहे. सीरियातील दोन हजार सैन्य मागे घेणे  ही धोरणात्मक घोडचूक आहे, असे मॅटिस यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button