अमेरिका-चीन व्यापार युद्धात तोडगा नाहीच
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/usa-china-696x392.jpg)
वॉशिंग्टन – अमेरिका आणि चीन यांच्यात सध्या जे व्यापार युद्ध सुरू आहे त्यावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही देशांतील प्रतिनिधींची येथे झालेली चर्चा कोणत्याही निर्णयाविनाच संपली. त्यामुळे दोन्ही बाजू आपआपल्या निर्णयांवर ठाम असल्याचे यातून स्पष्ट झाल्याने हे व्यापार युद्ध भविष्यात आणखी तीव्र होत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या चर्चेच्या संबंधात माहिती देताना व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या लिंडसे वाल्टर यांनी सांगितले की सध्याच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर त्यात पारदर्शकता, समतोल आणि योग्यता कशी आणता येईल यावर या बैठकीत चर्चा झाली. तथापी ही बैठक अनिर्णित राहिली किंवा कसे ते मात्र लगेच समजू शकले नाही. मात्र या प्रकरणात पुन्हा चर्चा होईल की नाहीं या विषयी व्हाईट हाऊस तर्फे कोणतेच भाष्य करण्यात आलेले नाही. चीननेही या वर प्रतिक्रीया देताना चर्चा मोकळ्या आणि विधायक वातावरणात झाली एवढेच नमूद केले आहे.
अमेरिकेने अलिकडेच चीनच्या 16 अब्ज रूपयांच्या मालावर आयात कर लागू केला आहे. त्यावर तशाच प्रकारचे प्रत्तयुत्तर चीननेही दिले आहे. पण हे प्रकरण एवढ्यावरच थांबलेले नाहीं तर चीनकडून आयात केल्या जाणाऱ्या 200 अब्ज डॉलर्सच्या मालावर कर लागू करण्याचा निर्णय ट्रम्प प्रशासनाने घेतला आहे.