अमरिकेचं नागरिकत्व हा जन्मसिद्ध हक्क नाही – ट्रम्प यांचा प्रस्ताव
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/donald-trump.jpg)
अमेरिकन काँग्रेसच्या निवडणुकीआधी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्थलांतरीत नागरिकांविरोधातील आपली भूमिका अधिक कठोर केली आहे. अमेरिकेत बेकायदा वास्तव्य करणारे आणि बिगर अमेरिकन नागरिकांच्या मुलांना जन्मानंतर मिळणाऱ्या घटनात्मक नागरिकत्वाच्या अधिकारावर लवकरच गदा येऊ शकते. बिगर अमेरिकन नागरिक किंवा बेकायदा वास्तव्य करणाऱ्यांच्या मुलांचा अमेरिकेत जन्म झाल्यास त्यांना अमेरिकन नागरिकत्व मिळते.
ट्रम्प यांना नागरिकत्वाचा हा अधिकार संपुष्टात आणायचा आहे. एका मुलाखतीमध्ये त्यांनी ही माहिती दिली. फक्त एका आदेशावर स्वाक्षरी केल्यास बर्थराईटची ही तरतूद रद्द होऊ शकते असे ट्रम्प म्हणाले. ही तरतूद रद्द करण्यासाठी घटनात्मक दुरुस्तीची गरज नाही असे ते म्हणाले. ही तरतूद रद्द करण्यासाठी घटनात्मक दुरुस्ती करावी लागेल असे मला आधी सांगण्यात येत होते. पण अशी कुठलीही गरज नाही असे त्यांनी सांगितले.
स्थलांतरीतांच्या मुद्दावर भर दिल्यास आपल्या समर्थकांना ऊर्जा मिळते तसेच सिनेट आणि प्रतिनिधी सभागृहात रिपब्लिकन्सना राजकीय लाभ होतो असे ट्रम्प म्हणाले. अमेरिका असा जगातील एकमेव देश आहे. जिथे एखादी व्यक्ती आल्यानंतर त्याला मूल झाले तर त्या मुलाला देशाच्या नागरिकत्वाबरोबर सर्व लाभ मिळतात असे ट्रम्प म्हणाले. हा एक मूर्खपणा असून तो संपवण्याची गरज आहे असे ट्रम्प म्हणाले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची कमान संभाळल्यापासून त्यांनी अमेरिका फर्स्ट हे धोरण अवलंबले आहे. व्यापारापासून ते व्यवसायापर्यंत फक्त अमेरिकन नागरिकांनाच पहिले प्राधान्य मिळाले पाहिजे अशी त्यांची राजकीय भूमिका आहे. त्यामुळे जगभरातून त्यांच्यावर बरीच टीकाही सुरु असते. अमेरिकेच्या हिताचा दाखला देत त्यांनी आधीच्या राष्ट्राध्यक्षांनी केलेले महत्वाचे जागतिक करारही मोडीत काढले आहेत.