अफगाणिस्तानातील हत्याकांडात ठार झालेल्या हिंदु व शिखांना अमेरिकेत श्रद्धांजली
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/afgan-flag.jpg)
वॉशिंग्टन – अफगाणिस्तानात अलिकडेच काही इस्लामिक दहशतवाद्यांकडून तेथील अल्पसंख्य हिंदु आणि शिखांची हत्या करण्याचा प्रकार घडला आहे. या प्रकारात मरण पावलेल्या व्यक्तींना अफगाणिस्तानच्या अमेरिकेतील दूतावासाने एका कार्यक्रमात श्रद्धांजली अर्पण केली आहे. जलालाबादला हे हत्यांकांड 1 जुलै रोजी झाले होते त्यात 18 हिंदु आणि शिख नागरीक मारले गेले होते. हे नागरीक जलालाबादला अफगाणिस्तानच्या अध्यक्षांना भेटण्यासाठी जात असताना त्यांच्या ताफ्यावर इस्लामिक स्टेटच्या गनिमांनी आत्मघाती हल्ला चढवला होता.
अफगाणिस्तानचे अमेरिकेतील राजदूत हमुद्दुल्ला मोहीब यांनी म्हटले आहे की आम्ही गेल्या रविवारी आमच्या दूतावासात या हत्याकांडात मरण पावलेल्यांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम घेतला होता. ते म्हणाले की तेथे राहणारे हिंदु आणि शीख नागरीक हे भारतातून तेथे आलेले नाहीत तर अनेक पिढ्यांपासून ते तेथेच राहात असून ते अफगाणिस्तानचे मुळचे निवासी आहेत. न्युयॉर्क मधील अफगाणि हिंदु संघटनेचे अध्यक्ष सेना लुंड यांनी या हल्ल्यात ठार झालेल्या नागरीकांची नावे वाचून दाखवली. या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाला भारताच्या अमेरिकेतील दूतावासाचेही काहीं अधिकारी उपस्थित होते.