अपयश लपविण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षेचा भावनिक वापर!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/03/Untitled-5-27.jpg)
काँग्रेस कार्यकारिणीच्या ठरावात मोदींवर हल्ला
आपल्या महाभयंकर चुका आणि सातत्याने केलेले फसवे दावे झाकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्दय़ाचा घातक भावनिक वापर करून लोकांचे लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप काँग्रेस महासमितीने मंगळवारी राजकीय ठरावाद्वारे केला. तसेच यावेळी त्यांना मतदारांची फसवणूक करण्यात यश येणार नाही, असा विश्वासही व्यक्त केला.
राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्दय़ावर अवघा देश एक आहे. देश सर्वप्रथम आहे, यात कुणाचेच दुमत नाही. पण जो मुद्दा राजकारणातीत आहे त्यावरूनच राजकारण करण्याचा क्षुद्र प्रयत्न पंतप्रधान मोदी यांनी चालवला आहे. मोदी यांनी दिलेली आश्वासने त्यांना पूर्ण करता आलेली नाहीत. ते अपयश झाकण्यासाठीचीच ही धडपड आहे, अशी धारदार टीका काँग्रेसच्या ठरावात करण्यात आली आहे. पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस महासमितीची ही बैठक मंगळवारी अहमदाबादमध्ये झाली. या बैठकीत ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, मनमोहन सिंग, अहमद पटेल, गुलाम नबी आझाद आणि प्रियंका गांधी वढेरा सहभागी झाल्या होत्या.
या ठरावात पुढे म्हटले आहे की, ‘‘देशाच्या शत्रूंना काँग्रेस महासमिती या ठरावाद्वारे असा स्पष्ट इशारा देऊ इच्छिते की, त्यांचे मनसुबे उधळून लावण्यासाठी हा देश संघटितपणे उभा आहे. भारताचा पाया हा सुदृढ लोकशाहीचा आहे. आमच्या शौर्यशाली सेनादलांचा आम्हाला अभिमान आहे. आमचे सेनादल दहशतवादासमोर कदापि पराभूत होणार नाही.’’
महासमितीने ठरावात म्हटले आहे की, ‘‘देशात विशेषत: महिला, विद्यार्थी, प्रज्ञावंत, लेखक आणि उद्योजक यांच्यात भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण आहे. अनुसूचित जाती-जमाती आणि अल्पसंख्यकांच्या हिताचे रक्षण करणाऱ्या राज्यघटनेवर आणि घटनात्मक संस्थांवर वारंवार हल्ले चढविले जात आहेत. देशाचा लोकशाहीवादी पाया सुरक्षित राखण्यासाठी एकत्रित प्रयत्न झाले पाहिजेत.’’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमधून मतदारांना ठोस संदेश देताना काँग्रेसने म्हटले आहे की, भाजप सरकारमुळे अर्थकारणाची तसेच देशाची जी अपरिमित हानी झाली आहे ती भरून काढण्यासाठी केंद्रात सत्तांतर आवश्यक असून त्यासाठी मतदारांना आम्ही आवाहन करीत आहोत. सर्व लोकशाहीवादी आणि प्रागतिक पक्षांनी आणि गटांनी संघटित होऊन आपली शक्ती पणाला लावून भाजप सरकारला उघडे पाडण्यासाठी लढा द्यावा, असे आवाहनही काँग्रेसने ठरावाद्वारे केले आहे.
महासमितीच्या बैठकीतील भाषणात राहुल गांधी यांनी समाजात भेद निर्माण करून द्वेष पसरवणाऱ्या प्रतिगामी शक्तींच्या विरोधात संघटित लढा देण्याची गरज अधोरेखित केली. ते म्हणाले, ‘‘गांधीजींच्या ऐतिहासिक दांडी यात्रेच्या आजच्या स्मरणदिनी काँग्रेस महासमितीने संघ आणि भाजपचे प्रतिगामी, द्वेषाधारित आणि भेदमूलक तत्त्वज्ञान धुळीस मिळवण्याचा संकल्प सोडला आहे. या लढय़ात आमचा विजय निश्चित आहे.’’ यासाठी केलेला कोणताही त्याग आणि कोणताही प्रयत्न हा लहान नव्हे, असे ट्विटही त्यांनी नंतर केले.
सहा दशकांनंतरची बैठक
* तब्बल ५८ वर्षांनंतर काँग्रेस महासमितीची बैठक गुजरातमध्ये झाली. याआधी १९६१मध्ये भावनगर येथे ही बैठक झाली होती.
* बैठकीच्या दिवशीच दांडी यात्रेचा स्मरण दिन होता. १२ मार्च १९३०रोजी गांधीजींनी दांडी यात्रा काढून मिठाचा सत्याग्रह केला होता. त्याचे औचित्य महासमिती बैठकीसाठी साधण्यात आले.
* सर्व नेत्यांनी प्रथम साबरमती आश्रमास भेट देऊन महात्मा गांधी यांच्या स्मृतीस आदरांजली वाहिली.
* सरचिटणीसपदी नियुक्त झाल्यानंतर प्रियंका गांधी प्रथमच प्रियंका गांधी या महासमितीच्या बैठकीत सहभागी झाल्या.
द्वेषाचे रुपांतर प्रेमात करण्याची या देशाची संस्कृती आहे. देश वाचविण्यास आपले प्राधान्य असायला हवे. त्यामुळे अधिक सजग राहून कार्यरत राहणे ही देशभक्तीच ठरेल. क्षुल्लक मुद्यांना बळी पडू नका. मोठमोठी आश्वासने देणाऱ्यांना प्रश्न विचारा आणि शहाणपणाने निर्णय घ्या.
– प्रियंका गांधी
दहशतवादाविरोधात देश संघटितपणे उभा असताना पंतप्रधान मोदी हे केवळ निवडणुकांवर डोळा ठेवून विरोधकांच्या देशभक्तीविषयी शंका घेत देशात दुही माजवू पाहात आहेत ही निंदनीय गोष्ट आहे.
– आनंद शर्मा, काँग्रेस प्रवक्ते