अटल बिहारी वाजपेयी यांच्या सुरक्षेत मोठी चूक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/former-prime-minister-atal-bihari-v.jpg)
एम्स रुग्णालय प्रशासनाची चुप्पी : पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात
नवी दिल्ली – माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सुरक्षेत मोठा बेजबाबदारपणा समोर आला आहे. अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर सध्या दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वाजपेयी यांच्या सुरक्षेसाठी मोठा बंदोबस्त याठिकाणी करण्यात आला आहे. मात्र हे सुरक्षा कवच भेदण्याचा प्रकार समोर आला आहे.
एम्सच्या कार्डिऍक न्यूरो सेंटरमध्ये कार्यरत असणाऱ्या टेक्निशिअनने आपल्या साथिदारासोबत अटल बिहारी वायपेयी दाखल असलेल्या आयसीयूमध्ये प्रवेश केला. हॉस्पिटलचा कर्मचारी असल्याने टेक्निशिअनला सहज प्रवेश मिळाला. मात्र आपला साथिदाराला डॉक्टर असल्याचे त्याने सुरक्षा कर्मचाऱ्यांना सांगितले. गेल्या शनिवारी हा प्रकार घडला असून दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. टेक्निशिअनला हॉस्पिटल प्रशासनाने निलंबित केले आहे.
टेक्निशियनसोबत वाजपेयी यांच्या आयसीयू वॉर्डमध्ये आलेल्या साथिदाराचा हेतू वाईट नव्हता. त्याला केवळ वाजपेयी यांना पाहण्याची इच्छा होती. त्यामुळे पोलिसांनी चौकशी करुन त्यांची सुटका केली.
आयसीयूमध्ये जाण्यासाठी मास्क लावावा लागतो. मात्र टेक्निशिअनच्या मित्राला मास्क लावणे जमत नव्हते. त्यावेळी सुरक्षारक्षकांना संशय आल्याने त्यांनी कसून चौकशी केल्यानंतर सत्य समोर आले. एम्स प्रशासनाने याबाबत माहिती देणे टाळले आहे.
अटल बिहारी वाजपेयी यांना 11 जूनला किडनीचा त्रास जाणवू लागल्याने एम्स रुग्णालयात भरती करण्यात आले होते. वाजपेयी डिमेंशिया या विसरण्याच्या आजाराने ग्रस्त आहेत. 2009 पासून ते व्हीलचेअरवर आहेत. एम्समध्ये भरती करण्यापूर्वी त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते.