अध्यात्म । भविष्यवाणीलेख

अहिंसा व करुणेचे महान पुजारी – भगवान महावीर

श्रमण भगवान महावीर खऱ्या अर्थाने श्रमण होते. सर्व समाजासाठी श्रमणारे श्रमण, समभाग जागविणारे, समाजाचे स्वास्थ, प्राणीमात्रांचे सुख हिरावून घेणाऱ्या, राग, लोभ, मोह, माया या विकारावर विजय मिळविणारे शमन होते. आपल्याप्रमाणे सर्वांना मानने, लेखणे, समजणे आणि त्याप्रमाणे चालणे बोलणे वर्तन असणे या आचारधर्माचे भाव ‘समभाव’ होत.

भगवान महावीरांनी “अहिंसा व करुणा” व्रतावर सर्वाधिक भर दिला. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रहः या व्रतात “अहिंसा” केवळ प्रथम स्थानावर नाही तर या पाच व्रतात अहिंसा हे व्रत महामेरु आहे.

इंग्रजी साहित्यिक जॉर्ज बनॉर्ड शॉ यांनी भारतीय संस्कृतीबरोबर जैन संस्कृतीचाही अभ्यास केला होता. त्यांनी एकेठिकाणी म्हटले आहे नुसते वाचन केले पण मनामध्ये “दया, माया, करुणा” नसेल तर ग्रंथ वाचणे निरर्थक आहे. रामायण, गीता, महाभारत आगम हे किंवा अन्य कोणत्याही धर्मग्रंथातून एकच सूर निघतो. प्रत्येक प्राणीमात्रांवर दया करा. सर्वांवर दया, करुणा, प्रेमाचा वर्षाव करा. म्हणजेच अहिंसेचे पालन करणे होय. कोणाचाही प्राण घेण्याचा आपल्याला अधिकार नाही. जीवन चांगले व्यतीत व्हावे यासाठी अहिंसा व प्रेमाने वागा. केवढा सखोल अभ्यास होता “जॉर्ज बनॉर्ड शॉ यांचा !

पण विवेक व विचार हरवून बसलेल्या सद्यपरिस्थितीत विज्ञान एखाद्या हिंस्र पशुसारखी हिंसा करीत आहे. मानवी जीवनाचा समतोल बिघडत चालला आहे. राष्ट्राराष्ट्रातील वैमनस्य व राष्ट्रगती अराजकता ही अटळ गोष्ट झाली आहे. जगांत सर्वत्र, अत्याचार, भष्ट्राचार, हिंसा, बॉम्बस्फोट युद्धांचा वापर अश्या अनेक बाबींमुळे जीवन भयग्रस्त व अशांत झाले आहेत. या अणुयुगांत हिंसा विविध प्रकाराने प्रगट होत आहे

घराघरातून, समाजातून, गावातून व देशातून अनेक मार्गांनी हिंसा अत्याचार होत आहे. दोन देशातील युद्ध शीतयुद्ध या पातळीला पोहचले आहे की, अणुयुद्धाचा भडका कधी उडेल आणि देशाचा नाश कोणत्या क्षणी होईल हे सांगता येत नाही. सारे जगच आज विनाशाच्या दरीच्या काठावर उभे आहे. केवळ “अहिंसाच” जगाला तारक आहे. अहिंसेच्या अमृतमयी तत्त्वानेंच जगाचा व मानवजातीचा नाश टळणार आहे.

जगातील कोणत्याही राष्ट्रातील लोकांना युद्ध नको आहे. सुखशांतीसाठी युद्ध मारक आहे. शखांस्त्रांची लक्षणीय कपात आणि त्यावरील अवाढव्य खर्चात घट झाली तर त्यांतून जग भयमुक्त होईल आणि ही संपत्ती मानवजातीच्या कल्याणासाठी वापरता येईल. विकसित देशांनी अविकसित आणि अर्धविकसित अशा विकसनशील देशाच्या पाठिशी उभे राहून सहाय्यभूत होण्यास मदत होईल. याचबरोबर निसर्गाचा समतोल, जागतिक शांतता, लोकशाही प्रधान संस्कृती, सर्वधर्म समभाव आणि विकासाची समान संधी या पंचसूत्रीचा वारसा पुढील पिढ्यांच्या हाती देणे गरजेचे आहे.

वास्तविक आज जगांत अनेक धार्मिक तत्त्वज्ञानांचा पगडा दिसून येतो. सर्वत्र धर्म, शांतता, सहजीवन आणि आत्मिक उन्नतीचा मार्ग दाखवितात. त्या दृष्टिने सर्वच धर्म वंदनीय आहेत. भगवान महावीरांच्या धर्म-तत्त्वज्ञानाचे वेगळेपण म्हणजे त्यांनी देवपण नाकारले. परमेश्वराची उपासना करून फळ मिळणार नाही तर त्यासाठी स्वतः कष्ट केले पाहिजेत. झिजले पाहिजे ही शिकवण त्यांनी दिली. जन्मावर जात न ठरविता कर्मावर भर दिला. त्यांची प्रथम शिष्या दासी होती तर प्रथम शिष्य भिल्ल होता यांतून सामाजिक दृष्टीकोन जाणवतो. हा सामाजिक पाया विस्तृत होत असतानाच भगवान महावीरांनी अनेकांतवाद, अहिंसा, अपरिग्रह, सत्य, अस्तेय, करुणा आदि मौलिक मूल्येंही मानवसमूहाला दिली.

पर्यावरण रक्षण व संवर्धन म्हणजेच निसर्गाशी नाते. “जगा आणि जगू द्या” हा संदेश भगवान महावीरांनी दिला . २१ व्या शतकांत प्रवेश करणाऱ्या मानवी समाजाला भगवान महावीरांच्या या मानवी मूल्या यासाठी आपल्या हृदयांत नेहमी दया, करुणा, अहिंसा आणि सत्य यांना स्थान दिले पाहिजे तर आपले जीवन सुखी होऊ शकेल.

प्रज्ञा आणि करुणा ही भारतीय संस्कृतीत दिलेली महत्त्वाची मूल्ये आहेत. जीवनातील एक पवित्र कार्य आहे. दुःखी, कष्टी, माणसाच्या डोळ्यातील अश्रू पुसणे हे जीवनांतील एक पवित्र कार्य आहे. पुण्य बुद्धाने एक ठिकाणी म्हटले आहे की, जगातील शेवटच्या माणसांच्या डोळ्यातील अश्रू पुसले जाईपर्यंत मला मोक्ष नको. करुणा व अहिंसा ही भारतीय संस्कृतीतील नव्हे जगाच्या इतिहासातील भव्य उदात्त अविष्कार आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज यांनी ७०० ओव्या लिहील्या आहेत . संत तुकाराम महाराज यांच्याही काव्यात अहिंसा आणि प्रेम या मुल्याना प्राधान्य दिले आहे . यांचा विचारांचा खोलवर ठसा जनमनावर खोलवर उमटला आहे . त्यानी शाकाहार व व्यसनमुक्ती सारख्या तत्वानाही महत्व दिले आहे. मुस्लीम समाजात रसिया नावाच्या महान साध्वीजी होऊन गेल्या , त्यांच्या रोमारोमात अहिंसा, सत्य , दया, करुणा , प्रेम हे गुण भिनलेले होते .जीवनाच्या अस्तित्वाला आणि संवर्धनाला हीच मुल्ये आधारभूत आहेत .अशा या जगद्गुरु भगवान महावीर प्रभुंना कोटी कोटी प्रणाम !

– शशिकला शहा
माजी नगराध्यक्षा,
तळेगाव दाभाडे नगरपरिषद .
मो. ९४२३०८०१९७. 

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button