आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मान
मुंबई : ज्येष्ठ निरूपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना राज्य शासनाचा प्रतिष्ठेचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार केंद्रीय गृहमंत्री अमिश शाह यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काही केंद्रीय मंत्री, राज्य मंत्रिमंडळ सदस्यांसह आमदार, खासदार आणि काही उद्योजक उपस्थित होते.
ज्येष्ठ निरूपकार आणि पद्मश्री किताबाने सन्मानित डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना राज्य सरकारचा सर्वोच्च महाराष्ट्र भूषण पुरस्कार काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या रेवदंडा इथल्या त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती.
दरम्यान, २००८ मध्ये महाराष्ट्र शासनातर्फे ज्येष्ठ निरूपणकार दिवंगत नानासाहेब धर्माधिकारी यांना मरणोत्तर महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं गौरविण्यात आलं होतं. ज्येष्ठ निरूपणकार दिवंगत नानासाहेब धर्माधिकारी यांचे सुपुत्र पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी हा पुरस्कार स्वीकारला होता. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला होता. या पुरस्काराच्या वेळी खारघर येथील ५१० एकराच्या परिसरात ४० लाखांहून अधिक लोक जमा झाले होते. गर्दीच्या या उच्चांकाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये २०१० मध्ये नोंदही करण्यात आली होती.