TOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशराजकारणराष्ट्रिय

आनंदाचा शिधाः रविंद्र चव्हाण म्हणतात, पिशव्यांशिवाय आनंदाचा शिधा देण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले होते

नागपूर ः दिवाळीत शिंदे-फडणवीस सरकारकडून ‘आनंदाचा शिधा’चं वाटप करण्यात आलं होतं. सामान्य नागरिकांना दिवाळीतील फराळ बनवणे खर्चिक पडू नये म्हणून साखर, चणाडाळ, रवा आणि पामतेल आदी चार जिन्नस अवघ्या १०० रुपयांत रेशन दुकानांमार्फत देण्यात आले. मात्र, ‘आनंदाचा शिधा’ असलेल्या पिशव्यांवर स्थानिक नेत्यांचे फोटो छापण्यासाठी वेळ गेल्याने नागरिकांपर्यंत शिधा पोहोचण्यास विलंब झाला. यावरून शिवसेनेच्या आमदार डॉ. मनिषा कायंदे यांनी विधान परिषदेत लक्षवेधी सूचना मांडली. यावरून अन्न व नागरी पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण यांनी मूळ उत्तराला बगल देत आम्ही पिशव्यांशिवायही आनंदाचा शिधा देण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले होते, असं म्हणाले.

‘आनंदाचा शिधामध्ये चार जिन्नस होते. हे चारही जिन्नस हातातून घेऊन जाणं शक्य नाही. त्यामुळे आम्ही पिशवी देण्याचं ठरवलं. तसंच, पिशव्यांची वाट न पाहता जे जे जिन्नस रेशन दुकानांपर्यंत पोहोचलं आहे त्याचं वाटप करण्याचेही निर्देश देण्यात आले होते. पिशव्यांशिवाय वाटप करा असे आदेश देण्यात आले होते, असं रविंद्र चव्हाण यांनी आज विधान परिषदेत सांगितलं. उत्तर देताना त्यांनी मूळ प्रश्नालाच बगल दिली.

आज विधान परिषदेत लक्षवेधी सूचनांच्या माध्यमांतून आनंदा शिधा वाटपात झालेला गैरप्रकार विरोधी पक्षांनी मांडला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, मनिषा कायंदे, सचिन अहिर यांनी याबाबत अनेक हरकती मुद्दे मांडले. यावर उत्तर देताना रविंद्र चव्हाण म्हणाले की, दिवाळीच्या काळात ९७ टक्क्यांपर्यंत जास्त आनंदाचा शिधाचे किट्स दिले गेले. आतापर्यंत सर्वाधिक प्राधान्य कुटुंब धान्य उचल करण्याची टक्केवारी ९१ टक्के आहे. मे २०२२ मध्ये सर्वाधिक उचल झाली होती. तर, सर्वाधिक कमी उचल नोव्हेंबर २०२२ मध्ये झाली. परंतु, दिवाळीत वाटण्यात आलेला शिधाची ऑक्टोबरमध्ये उचल ९७ टक्के होती. तसंच, उर्वरित शिधाचंही लवकरच वाटप करण्यात येईल.

वितरणात उणिवा, रविंद्र चव्हाण म्हणाले कारवाई करू
आनंदाचा शिधा वितरणामध्ये उणिवा राहिल्याची तक्रार सचिन अहिर यांनी केली. तसंच, त्यांचं राजकीय व्यासपीठावरही सरसकट वाटप झालं. शिधापत्रिका नसलेल्या नागरिकांनाही आनंदाचा शिधा किट्स मिळाले, असा दावा अहिरांनी केला. त्यावर रविंद्र चव्हाण म्हणाले की, अशाप्रकारचे धान्याचं वाटप केलं जातं तेव्हा सप्ताह साजरा करण्याचे केंद्राचे पूर्वीपासूनचेच निर्देश आहेत. धान्य प्राधान्य कुटुंबातील प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येक व्यवस्थेने एकत्र येणं गरजेचं आहे. आनंदाचा शिधा वाटपाचा कार्यक्रम पहिल्यांदाच शिंदे फडणवीस सरकारच्या काळात हाती घेण्यात आला आहे. त्यामुळे या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी सर्व यंत्रणांनी एकत्र येत त्याचं वाटप केलं. जर, वितरणात उणिवा राहिल्या असतील तर चौकशी करून कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाहीही चव्हाणांनी यावेळी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button