breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

‘खारघर घटनेची निवृत्त न्यायाधिशांमार्फत चौकशी व्हावी’; अजित पवारांची राज्यपालांकडे मागणी

सरकारवर तातडीने सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा

मुंबई : खारघर येथे ‘महाराष्ट्र भूषण’ कार्यक्रमाच्यावेळी झालेल्या दुर्घटनेत १४ निष्पाप अनुयायांचा मृत्यू झाला तर अनेक जण बाधित झाले. ही दुर्घटना उष्माघाताने झाल्याचे पहिल्यांदा सांगितले जात होते. मात्र या कार्यक्रमासाठी उपस्थित प्रत्यक्षदर्शींकडून तसेच समाजमाध्यमं, प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून या कार्यक्रमात चेंगराचेंगरी झाली, उपस्थित अनुयायी सात तास अन्न-पाण्याशिवाय होते, कार्यक्रमाचे आणि गर्दीचे योग्य नियोजन करण्यात आले नव्हते, अशी माहिती समोर येत आहे. तरी या घटनेमागचे सत्य बाहेर येण्यासाठी या दुर्दैवी घटनेची निवृत्त न्यायाधिशांमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्राद्वारे राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे केली आहे.

‘महाराष्ट्र भूषण’ सोहळ्यात उपस्थित अनुयायांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती, अनुयायी ७ तास पाण्याशिवाय व खाण्याशिवाय उन्हात होते व त्यामुळे अनेकांना त्रास झाला, गर्दीचे योग्य नियोजन न केल्यामुळे रुग्णवाहिका रुग्णांपर्यंत पोहोचण्यात अक्षम्य विलंब झाल्यामुळे वेळेत उपचार मिळू शकले नाहीत, राज्यात उष्णतेची प्रचंड लाट असताना उघड्यावर उन्हात कार्यक्रम आयोजित करण्यात आला, कार्यक्रम आयोजनाची जबाबदारी पार पाडण्यासाठी निवडलेल्या कंपनीला अशा भव्य कार्यक्रम आयोजित करण्याचा अनुभव नव्हता, जाहीर करण्यात आलेल्या मृतांच्या संख्येपेक्षा अधिक अनुयायांचा मृत्यू झाला, अशा अनेक बाबी टप्प्याटप्प्याने उघडकीस येत आहेत. या सर्व बाबींची शहानिशा करुन त्यामधील सत्य जनतेसमोर येणे अत्यंत गरजेचे आहे, असे अजित पवार यांनी म्हटलं आहे.

राज्यात मागील काही दिवसातील तापमान ३८ ते ४० अंश सेल्सिअस आहे. उष्णतेची प्रंचड मोठी लाट राज्यात आलेली आहे. त्यामुळे एवढा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यापूर्वी सर्व शक्यतांची पडताळणी शासनाकडून होण्याची आवश्यकता होती. तथापि, ती न झाल्यामुळे १४ अनुयांयाचा नाहक बळी गेला. ही दुर्दैवी घटना नैसर्गिक नसून शासननिर्मित आहे, सदोष नियोजनामुळे ही दुर्दैवी घटना घडली आहे. त्यामुळे या घटनेला आणि मूत्यूला पूर्णपणे सरकार जबाबदार आहे. त्यामुळेच तातडीने सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, कार्यक्रम आयोजनाबाबत घेतलेला निर्णय, आयोजनातील त्रुटी आणि ही दुर्दैवी घटना याची निवृत्त न्यायाधिशांकडून चौकशी करावी, मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २० लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी, जखमी अनुयांयावर मोफत उपचार करुन त्यांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत करावी, भविष्यात अशा घटना घडणार नाहीत, यासाठी मार्गदर्शक सूचना तयार करण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करावी, अशी मागणी अजित पवार यांनी केली होती. मात्र, एकाही मागणीबाबत सरकार सकारात्मक दिसत नसल्याने सरकारचे प्रमुख म्हणून या मागण्या मान्य करण्याबाबत आपण सरकारला निर्देश द्यावेत, अशी मागणी अजित पवार यांनी राज्यपालांना पत्राद्वारे केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button