breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यालयावर अजित पवार गटाचा दावा

पुणे : निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्यात  आल्यानंतर आता त्याचे  पडसाद कार्यालयांमध्येही उमटू लागले आहेत. पक्ष आणि चिन्हाचा फैसला झाल्यानंतर कार्यालयांमध्ये सुद्धा वाद जाऊन पोहोचला आहे.या कार्यलयावर दावा करण्यासाठी आजही अजित पवार गटाचे कार्यकर्ते येण्याची शक्यता आहे किंवा कार्यकर्त्यांमध्येदेखील वादावादी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील राष्ट्रवादीच्या कार्यालयावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पुण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यालयावरुन घड्याळ चिन्ह काढून टाकलं आहे. मात्र भविष्य़ात पुण्यातील राष्ट्रवादी कार्यालयावर अजित पवार गटाचा दावा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादी  अजित पवार गट आणि शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे.त्यासोबतच अजित पवारांच्या हस्ते या पक्ष कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं होतं. ती पाटीदेखील काढून टाकण्यात आली त्यामुळे अजित पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.

निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्यात आलं. त्यानंतर पुण्यातील राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने जल्लोष साजरा केला एकमेकांना पेढे भरवत हा जल्लोष साजरा केला. अजित पवार गटाचे पुणे शहर शहराध्यक्ष दिपक मानकर यांनीदेखील विजयी गुलाल उधळला. त्यानंतर शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राष्ट्रवादी कार्यालयावरील घडाळ्याचं चिन्ह काढून टाकलं. त्यावेळी अनेक शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांचे डोळे पाणावले होते. आता मात्र शहरातील राष्ट्रवादीच्या कार्यालयावर अजित पवार गट दावा करण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र पुण्यातील शहर कार्यालय प्रशांत जगताप यांच्या नावावर असल्यामुळे अजित पवार गटाला कायदेशीर दावा करता येणार नाही प्रशांत जगताप यांनी माहिती दिली आहे. ही जागा जगताप यांनी भाडे तत्वार घेतल्यामुळे अजित पवार गटाला दावा करता येणार नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

हेही वाचा  – ‘नेहरूंचं आजही स्मरण, मात्र मोदींचं स्मरण राहणार नाही’; संजय राऊतांची टीका

पुणे हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर किमान राष्ट्रवादीच्या बालेकिल्यात वाद विकोपाला जाणार नाही याची अपेक्षा होती मात्र असं होताना दिसलं नाही. राष्ट्रवादीतील फुटीनंतर पुण्यातील राष्ट्रवादी पक्ष कार्यालयाच्या मालकीवरुन दोन्ही पक्ष एकमेकांंवर भिडल्याचं पाहायला मिळालं.  शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या करारनाम्याच्या आधारे हे पक्ष कार्यालय भाडेतत्वावर राष्ट्रवादी कॉंग्रेसने घेतलं होतं. मात्र फुट पडल्यानंतर अजित पवार गटाने हे कार्यालय ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र शरद पवार गटाने दाद दिली नाही. पक्ष आणि पक्ष चिन्ह अजित पवार गटाला मिळाल्यानंतर या पक्ष कार्यलयात अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी कार्यलयात शिरण्याचा आणि पक्ष कार्यालय ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे या पक्षकार्यालयाला मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button