आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ – कॉंग्रेसचा इशारा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/congress-0.jpg)
बंगळुरू – राज्यपालांनी आमच्याकडे बहुमत असल्याने कॉंग्रेस-जेडीएस आघाडीलाच सरकार स्थापनेसाठी प्रथम प्राधान्य दिले पाहिजे. गोवा आणि मणिपुरात तेथील राज्यपालांनी तसाच निर्णय दिला होता. पण भाजप नियुक्त राज्यपालांनी आमचा दावा टाळून भाजपला सरकार बनवण्यास पाचारण केले, तर आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊन दाद मागू असा इशारा कॉंग्रेसने दिला आहे.
सध्या बंगळुरातील एका पंचतारांकित हॉटेलात कॉंग्रेस आणि जेडीएसच्या नेत्यांनी तळ ठोकला आहे. कॉंग्रेसचे केंद्रीय निरीक्षक गुलामनबी आझाद हेही बंगळुरात तळ ठोकून आहेत. त्यांनी सांगितले की, राज्यपालांनी कोणत्या पक्षाकडे बहुमताचा आकडा आहे तो तपासूनच सरकार स्थापन करण्यासाठी कोणाला पाचारण करायचे याचा निर्णय घेतला पाहिजे. ते म्हणाले की भाजपकडे 104 आमदार आहेत अणि आमच्या आघाडीतील आमदारांची संख्या 117 इतकी असल्याने सहाजिकच आमचा दावा प्रबळ आहे. त्यामुळे राज्यपाल घटनाबाह्य निर्णय घेऊ शकत नाही.