युवा नेते पार्थ पवार यांनी केली दत्ता काकांच्या जनसंपर्क कार्यालयाची पाहणी
- घडलेल्या गंभीर प्रकाराची घेतली दखल
- गुन्हेगारी कृत्याचा केला निषेध
पिंपरी, (महाईन्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या चिखली येथील जनसंपर्क कार्यालयाची चार दिवसांपूर्वी तरुणांच्या टोळक्याने तोडफोड केली. त्याची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे युवानेते पार्थ पवार यांनी आज साने यांच्या कार्यालयाला भेट दिली. “कोणत्याही प्रकारचे वैर मनात न ठेवता लोकांची सेवा करण्याचा स्पष्ट हेतू समोर ठेवून काम करणारे नेते दत्ता साने यांच्यावर वैयक्तीक द्वेशापोटी प्राणघातक हल्ल्याचा कट रचला जात असेल तर ते निषेधार्ह आहे. पोलिसांनी घटनाक्रमाच्या मुळाशी जाऊन खरा सुत्रधार कोण आहे, याची उकल केल्याशिवाय घटनेचा शेवट होणार नाही”. “अन्यथा समाजात गुन्हेगारीला खतपाणी घालणा-या प्रवृत्तींच्या मनात कायद्याची भिती उरणार नाही”, अशी भावना पार्थ पवार यांनी यावेळी व्यक्त केली.
नेते पार्थ पवार यांनी प्रथम साने यांच्या घरी कार्यकर्त्यांची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा करून साने यांच्या तोडफोड केलेल्या कार्यालयाची पाहणी केली. कार्यालयातील टेबलावरील फोडलेल्या काचेचे तुकडे, साने यांच्या फोटोवर मारलेल्या फुल्या आणि फर्निचरचे किरकोळ नुकसान पाहून त्यांनी झालेल्या घटनेचे गांभिर्य लक्षात घेतले. हल्ला झाला त्यावेळी कार्यालयात कोण होते, अशी विचारणा देखील पवार यांनी केली. कर्मचारी महिलांना गुन्हेगारांकडून दुखापत वैगेरे आदींची त्यांनी जाणिवपूर्वक विचारणा केली. त्यावर साने यांनी घडलेल्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आणि फोटो त्यांना दाखविले. उद्या पोलीस आयुक्तांची भेट घेऊन आपण गुन्ह्याची खरी परिस्थिती जाणून घेण्याची तयारी देखील त्यांनी दाखविली.
- पोलिसांनी घटनेच्या मुळाशी जावे
घडलेला गुन्हेगारी प्रकार खूप गंभीर आहे. दत्ता काका हे तर लोकांची सेवा करण्याचा स्पष्ट हेतू समोर ठेवून काम करतात. त्यामुळे त्यांच्याशी वैर असण्याचे कारणच नाही. जरी वैर असले तरी ते एवढ्या खालच्या पातळीला जाईल, याची कल्पना करू शकत नाही. राजकीय द्वेश असेल अथवा अन्य काही, असा प्राणघातक हल्ला करण्याचा कट रचला जात असेल तर यामागे नक्कीच कोणाचा तरी हात असल्याचा संशय बळावतो. पोलिसांनी घटनेच्या मुळाशी जाऊन ख-या सुत्रधारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. अन्यथा समाजात अशा गुन्हेगारी कृत्यांना प्रवृत्त करणा-यांना कायद्याची भिती राहणार नाही, अशी भावना पवार यांनी व्यक्त केली.