स्थायीच्या सभापती चिडीचुप ; सदस्यच बोलतात मिठूमिठू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/is-women-empowerment.jpg)
महिला पदाधिकारी नामधारी ; पडद्यामागून कारभार हाकताहेत पतीदेव
पिंपरी – स्थानिक स्वराज संस्थेत महिलांना 50 टक्के आरक्षण देवून महिला सक्षमीकरणाचा मनोदय राज्यकर्त्यांनी व्यक्त केला. परंतू, ख-या अर्थाने अद्यापही महिला धीटपणे बोलत नसल्याचे दिसत आहे. महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी ममता गायकवाड यांची निवड होवून तब्बल दोन महिने लोटले आहेत. त्या सभापती झाल्यानंतर स्थायीच्या तब्बल आठ ते दहा मिटिंग झाल्या आहेत. तरी त्या अद्याप स्थायी समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयावर स्वताः एकही शब्द काढत नाहीत. त्यामुळे स्थायी समितीच्या सभापती अजून किती दिवस गप्प राहणार? असा प्रश्न सर्व सामान्य नागरिकांना पडला आहे. त्यामुळे स्थायीच्या सभापती चिडीचुप अन्ं सदस्यच मिठू मिठू बोलू लागल्याचे चित्र दिसून येत आहे. दरम्यान, महापालिकेच्या स्थायी समितीसह सर्वच महिला पदाधिका-यांचा कारभार पडद्यामागून त्यांचे पतीदेव पाहत आहेत.
राज्यात महिला सक्षमीकरणासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांत स्त्रियांसाठी 50 टक्के आरक्षण आहे. आरक्षणामुळे स्त्रियांना राजकीय क्षेत्रात काम करण्याची संधी प्राप्त झाली. महापालिकेत निम्माहून महिला विविध पदावर कामकाज करीत आहेत. तरी त्या अजूनही नामधारी असल्याचे दिसत आहे. प्रत्यक्षात त्यांना मनासारखा कारभार करण्याची मुभा मिळत नाही. त्यामुळे त्या सतत काहीही न बोलता शांत राहण्याचे धोरण पत्करले दिसत आहे. परंतु, काही महिला पदाधिका-यांचा त्यांचा कारभारात पुढाकार असतो.
महापालिकेत 128 नगरसेवक असून त्यात 64 महिला नगरसेविका आहेत. पालिकेच्या तिजोरीची चावी देखील महिलांच्या हातामध्ये आहे. विविध विषय समितींच्या सभापती, प्रभागांचे सभापती देखील महिलांची निवड झालेली आहे. त्यामुळे पालिकेचा निम्मा कारभार महिलांच्या हातामध्ये आहे. यामध्ये भाजपच्या तिकीटावर 40 महिला नगरसेविका, राष्ट्रवादी काँग्रेसच्या 17 तर शिवसेनेच्या चिन्हावर 4 आणि अपक्ष 3 महिला नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत.
महापालिकेच्या उपमहापौर पदावर शैलजा मोरे, स्थायी समिती अध्यक्षपदी ममता गायकवाड, विधी समिती सभापती माधुरी कुलकर्णी, महिला व बालकल्याण समिती सभापती स्विनल म्हेत्रे, जैव विविधता व्यवस्थापन समिती सभापती उषा मुंढे, शहर सुधारणा समिती सभापती सीमा चैागुले, अ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोऱखे, ब प्रभाग अध्यक्षा करुणा चिंचवडे, ‘क’ प्रभाग अध्यक्षा नम्रता लोंढे , ‘इ’ प्रभाग अध्यक्षा भीमाबाई फुगे, ‘फ’ प्रभाग अध्यक्षपदी कमल घोलप कार्यरत आहेत.
यातील बहुतांश महिला पहिल्यांदाच निवडून येवूनही त्या सभागृहात बोलण्याचा प्रयत्न करतात. त्यांचे प्रश्न मांडून बोलण्याचे धाडस करतात. तर काही पदाधिकारी अद्यापही काहीच बोलत नसल्याचे दिसत आहे. यामध्ये स्थायीच्या सभापतींसह अन्य प्रभाग सभापतींचा समावेश आहे. काहीच न बोलणा-या महिला सभापतींचा कारभार त्यांचे पतीदेव पडद्यामागून कारभार हाकत आहेत. त्यामुळे त्या महिला पदावर असूनही नामधारी असल्याचे दिसत आहे.
दरम्यान, स्थायी समितीच्या कारभारात सभापती ममता गायकवाड काहीच बोलत नसल्याने समितीतील अन्य नगरसेवक मिठू-मिठू बोलत आहेत. त्यामुळे महिला पदाधिकारी सक्षमपणे स्थायीचे कामकाज स्वताःहून कधी पेलणार ? असा सवाल पालिका वर्तुळातून विचारला जात आहे.