गंभीर गुन्ह्य़ातील आरोपीला पोलिसांकडून चारित्र्याचे प्रमाणपत्र!
मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल झालेल्या एकाला पुणे पोलिसांच्या विशेष शाखेकडून चारित्र्य प्रमाणपत्र देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणातील फिर्यादीच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्याने पोलिसांच्या अजब कारभाराची पोलखोल केली असून पोलिसांनी यंत्रणेतील त्रुटीमुळे प्रमाणपत्र देण्यात आल्याची कबुली दिली आहे.
सोमनाथ दत्तात्रय पानसरे हे मार्केटयार्डात हमाली करतात. त्यांचा ट्रान्सपोर्ट व्यवसाय आहे. गेल्या वर्षी १ सप्टेंबर रोजी पानसरे यांना हरि तुकाराम खाडे, अजय हरि खाडे, मंगेश तुकाराम फुंदे, संदीप सुभाष खाडे, विकी सुभाष खाडे यांनी मारहाण केली होती. पानसरे यांनी मार्केटयार्डात पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर त्यांना पोलिसांसमोर मारहाण करण्यात आली होती. फुंदे याला काम देण्यास नकार दिल्यानंतर फुंदेने साथीदारांकरवी ही मारहाण केली होती. पानसरे यांच्या तक्रारीनंतर खाडे, फुंदे यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या विरोधात मारहाण तसेच धमकावणे या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पानसरे यांनी ही माहिती दिली.
मार्केटयार्डात हमाली करताना त्याची नोंद पुणे माथाडी श्रमजीवी कामगार महामंडळात करणे बंधनकारक आहे. माथाडी कामगारांनी पोलिसांकडून चारित्र्य पडताळणी करणे बंधनकारक असून गंभीर गुन्हा दाखल झाल्यानंतर हमाली करण्यास मज्जाव करण्यात येतो.
दरम्यान, मला मारहाण करण्यात आल्यानंतर पोलिसांनी तासाभरात हरि खाडे, अजय खाडे यांना अटक केली. उर्वरित तीन आरोपींनी न्यायालयासमोर हजर होऊन जामीन मिळवला. गंभीर गुन्ह्य़ात अटक झाल्यानंतर त्याची नोंद चोवीस तासात संबंधित पोलीस ठाणे तसेच पोलीस आयुक्तालयातील ‘एमओबी’ (मोडस् ओपरेंडी ब्युरो) शाखेकडून करणे बंधनकारक आहे, असे पानसरे यांनी सांगितले. ते म्हणाले, गुन्हा दाखल झाल्यानंतर पाच आरोपींनी पुणे पोलिसांच्या विशेष शाखेत चारित्र्य प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज केले. आरोपी फुंदेची चारित्र्य पडताळणी करण्यात आली. तेव्हा त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नसल्याची नोंद पोलिसांना आढळून आली. गेल्या वर्षी १७ डिसेंबर रोजी फुंदेला चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र देण्यात आले.हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मी माहिती अधिकारात पोलिसांकडे अर्ज केल्याचे पानसरे यांनी सांगितले. या प्रकरणी विशेष शाखेतील पोलीस निरीक्षक संजय नारवाड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
पोलिसांच्याच माहितीत तफावत
गंभीर गुन्ह्य़ातील आरोपीला प्रमाणपत्र देण्यात आल्यानंतर मी पोलीस आयुक्तालयात तसेच मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात अर्ज केला. तेव्हा प्रमाणपत्र देण्यात आलेला आरोपी फुंदे याच्या अटकेची नोंद पोलिसांकडे नसल्याचे १७ एप्रिल रोजी पोलिसांकडून मला सांगण्यात आले. त्यानंतर मी पुन्हा माहिती अधिकारात माहिती मागविली, तेव्हा मात्र २३ मे रोजी आरोपींच्या अटकेची नोंद असल्याची माहिती मला देण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीत मला तफावत आढळून आली.वेळोवेळी दिलेल्या उत्तरांमधून तफावत आढळून आली, असे पानसरे यांनी सांगितले.