‘जाळ्यात अडकू नकोस’, अनुपम खेर यांचा गौतम गंभीरला सल्ला

अभिनेते अनुपम खेर यांनी माजी क्रिकेटर आणि नवनिर्वाचित खासदार गौतम गंभीरला एक मोलाचा सल्ला दिला आहे. काही ठराविक प्रसारमाध्यमांकडून प्रसिद्ध होण्याच्या जाळ्यात अडकू नकोस असं अनुपम खेर यांनी सांगितलं आहे. गौतम गंभीर याने गुरुग्राम येथे एका मुस्लिम तरुणाला झालेल्या मारहाणीच्या घटनेचा निषेध करत टीका केली होती. याच मुद्द्यावरुन अनुपम खेर यांनी हा सल्ला दिला आहे.
अनुपम खेर यांनी ट्विटरवरुन गौतम गंभीरला त्याच्या विजयाच्या शुभेच्छा देत सल्लाही दिला आहे. त्यांनी लिहिलं आहे की, ‘प्रिय गौतम गंभीर, विजयाच्या शुभेच्छा. एक भारतीय म्हणून याचा मला आनंद आहे. तू मला सल्ला विचारला नाही आहेस पण तरीही, काही ठराविक प्रसारमाध्यमांकडून प्रसिद्ध होण्याच्या जाळ्यात अडकू नकोस. तुझं काम तुझ्यासाठी बोलेल. तुझी वक्तव्यं नाही’.
काय होती घटना –
गुरुग्राम येथे पारंपारिक मुस्लीम टोपी घातली म्हणून एका २५ वर्षीय मुस्लिम तरुणाला चार अज्ञात तरुणांनी मारहाण केली होती. आलम याने पोलीस तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, सदर बाजार परिसरात काही अज्ञात तरुणांनी त्याला घेरलं आणि घातलेल्या पारंपारिक टोपीवर आक्षेप घेतला. ‘आरोपींनी मला धमकावलं. या परिसरात टोपी घालण्याची परवानगी नाही असं सांगू लागले. त्यांनी माझी टोपी काढली आणि कानाखाली लगावली. यावेळी त्यांनी मला भारत माता की जय अशी घोषणा देण्यासही सांगितलं’, अशी माहिती आलमने दिली.
गौतम गंभीरने केला निषेध –
गौतम गंभीरने गुरुग्रामची घटना खेदजनक असल्याचे म्हटले होते. पुन्हा असे कोणी करण्याची हिम्मत करु नये यासाठी इतरांच्या मनात धाक निर्माण होईल अशी कारवाई प्रशासनाने करावी अशी मागणी गौतम गंभीरने केली.
गौतम गंभीरने आपल्या टि्वटमध्ये भारत एक धर्मनिरपेक्ष देश आहे हे सांगताना प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी लगान चित्रपटासाठी लिहिलेल्या “ओ पालन हारे, निर्गुण और न्यारे” आणि राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या दिल्ली-६ चित्रपटातील “अर्ज़ियाँ” गाण्याचा दाखला दिला.








