‘निवडणूक आयोग पक्षपाती, मोदींचा प्रचार लक्षात घेता आखलं निवडणुकीचं वेळापत्रक’
निवडणूक आयोगाची भूमिका नेहमीच पक्षपाती राहिली आहे असा आरोप यावेळी राहुल गांधी यांनी केला आहे. नरेंद्र मोदी जे हवं तो बोलून जातात, इतर कोणी बोललं तर त्याला टोकलं जातं. मोदींना प्रचार करता यावा अशा पद्धतीने निवडणुकीचं वेळापत्रक तयार करण्यात आलं असाही आरोप यावेळी त्यांनी केला. आम्ही निवडणूक आयोगावर विश्वास ठेऊ शकतो त्यापेक्षा जास्त काही करु शकत नाही असंही यावेळी राहुल गांधींनी सांगितलं.
एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी पत्रकार परिषद घेत असताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचीही पत्रकार परिषद सुरु झाली. यावेळी राहुल गांधी यांनी मोदींच्या पत्रकार परिषदेत मागचे दरवाजेही बंद करण्यात आले आहेत असा आरोप केला. मी आपल्या बाजूने दोन तीन पत्रकार पाठवा असं सांगितलं होतं, जेणेकरुन आपले प्रश्न विचारले जातील. पण दरवाजे बंद करण्यात आले आहेत असं सांगण्यात आल्याचं राहुल गांधींनी सांगितलं.
यावेळा राहुल गांधी यांनी थेट प्रश्न विचारत माझ्यासोबत राफेलवर चर्चा का करत नाही ? अशी विचारणा केली. नरेंद्र मोदी पत्रकार परिषदेला उपस्थित असण्यावरुन टोला लगावताना निवडणुकीचे निकाल लागण्याच्या पाच दिवस आधी पत्रकार परिषद घेत आहेत असं सांगितलं.
नरेंद्र मोदींजवळ, भाजपाजवळ आमच्यापेक्षा खूप जास्त पैसा, मार्केटिंग, टेलिव्हीजन आहे. पण आमच्याकडे फक्त सत्य असून सत्याचाच विजय होईल असा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे. बेरोजगारी, शेतकरी, राफेल, जीएसटी, नोटाबंदी याच मुद्द्यावर निवडणूक लढली गेली असंही त्यांनी सांगितलं.
यावेळी राहुल गांधींनी मोदींच्या मुलाखतींवरुनही टोला लगावला. मला कठीण प्रश्न विचारले जातात. न्याय योजना, त्याचे पैसे कसे येणार वैगेरे विचारलं जात. पण मोदींना तुम्ही आंबे कसे खाता ? तुम्ही कपडे कुठून घेता ? असे प्रश्न विचारतात. प्रसारमाध्यमांनी असं पक्षपाती वागलं नाही पाहिजे असं ऱाहुल गांधींनी सांगितलं.
नरेंद्र मोदी मी बोलले तेच परत सांगत आहेत. जर नरेंद्र मोदींचे आई वडील जे राजकारणात नाही आहेत त्यांनी काही चुकीचं केल तरी मी त्यांच्याविरोधात बोलणार नाही. पण नरेंद्र मोदी माझ्याबद्दल, आई वडिलांबद्दल चुकीचं बोलायचं असेल तर ते त्यांच्यावर आहे. त्यांना हवं तितकं बोलू शकतात असं राहुल गांधींनी म्हटलं.
मी मायावती किंवा नरेंद्र मोदींच्या विरोधात नाही. जर नरेंद्र मोदींना माझ्यावर टीका करुन आनंद मिळत असेल तर त्यांनी करावी. माझा त्यावर आक्षेप नाही असंही राहुल गांधींनी सांगितलं. नरेंद्र मोदींनी आव्हानं स्विकारलेलं पहायला आवडलं असतं. त्यांनी शेतकरी, बेरोजगारीचं आव्हान स्विकारावं. महत्त्वाच्या मुद्द्यांवर तोडगा काढण्यासाठी त्यांना लोकांनी निवडून दिलं आहे