पिंपरी-चिंचवड महापालिका विरोधी पक्षनेतेपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे ठरतील ‘डार्क हॉर्स’?
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/05/Nana-Kate.jpg)
- चिंचवड विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी मोर्चेबांधणी
- दत्ता साने यांचा कार्यकाल संपुष्ठात आल्याने पक्षांतर्गत हालचाली सुरू
पिंपरी | विशेष प्रतिनिधी|
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिंचवड विधानसभेवरील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पकड मजबूत करण्यासाठी विरोधी पक्षनेतेपदाची धुरा ज्येष्ठ नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या खांद्यावर देण्यात येईल. त्याद्वारे भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप यांना आव्हान देण्याची भूमिका घेतली जाणार आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदासाठी नाना काटे ‘डार्क हॉर्स’ राहतील, असा अंदाज राजकीय जाणकारांनी वर्तवला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचा कार्यकाल आज (शुक्रवारी) संपला आहे. दरवर्षी विरोधी पक्षनेता बदलण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार एक वर्षाचा कार्यकाल संपल्याने पक्षश्रेष्ठी नवीन चेह-याला संधी देण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे चिखलीतील ज्येष्ठ नगरसेवक दत्ता साने यांची १७ मे २०१८ रोजी विरोधी पक्षनेतेपदी वर्णी लागली होती. साने यांची वर्षभराची कामगिरी सरस राहिली आहे. त्यांनी विविध विषयांवर आवाज उठविला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे म्हणाले की, अधिका-अधिक नगरसेवकांना संधी मिळावी यासाठी दरवर्षी विरोधी पक्षनेता बदलण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. याबाबतचे पक्षाचे धोरण ठरले आहे. त्यानुसार एक वर्षाचा कार्यकाळ संपल्याने विरोधी पक्षनेता बदलण्यात येईल. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर त्याबाबतची पुढील कार्यवाही केली जाईल.
चिंचवड विधानसभेतून नाना काटे यांनी विद्यमान आमदार जगताप यांच्या विरोधात २०१४ मध्ये निवडणूक लढवली होती. आता पुन्हा २०१९ साठी काटे इच्छुक आहेत. राष्ट्रवादीकडून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. आमदार जगताप यांना त्यांच्या बालेकिल्ल्यात आव्हान देण्यासाठी राष्ट्रवादीला तगडा उमेदवार द्यावा लागणार आहे. विरोधी पक्षनेतेपदाची संधी मिळाल्यास नाना काटे यांना सत्ताधाऱ्यांविरोधात रान पेटवला येईल. अवघ्या सहा महिन्यांवर विधानसभा निवडणूक आल्यामुळे विरोधी पक्षनेतेपदी वर्णी लागण्यासाठी नाना काटे प्रयत्नशील आहेत, अशी चर्चा आहे.
***
आता चिंचवडकरांचा मान निश्चित…
महापालिका निवडणुकीत सत्तांतर झाल्यावर पहिल्यांदा विरोधी पक्षनेतेपदी पिंपरी विधानसभेतील ज्येष्ठ नगरसेवक योगेश बहल यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्यावेळी भोसरीकरांना दत्ता साने यांच्या रुपाने संधी देण्यात आली. शहरातील समतोल साधण्याच्या दृष्टीने आता विरोधी पक्षनेतेपदाचा मान चिंचवडकरांसाठी पहिला राहील. असे असले तरी नाना काटे यांच्यासह पक्षाकडून या पदासाठी नगरसेविका वैशाली घोडेकर, नगरसेवक अजित गव्हाणे, राजू मिसाळ, मयूर कलाटे हेसुद्धा इच्छुक आहेत. त्यामुळे पक्षाचे ‘कारभारी’ अजित पवार आता कुणाला संधी देणार? याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.