ऑस्ट्रेलियाच्या रिझर्व्ह बँकेने नोटांमध्ये केली ‘ही’ चूक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/05/50-dollar.jpg)
लिहिताना अनेकदा झालेल्या स्पेलिंग मिस्टेक्स आपल्याला कोण ना कोण लक्षात आणून देत असतं. स्पेलिंग मिस्टेकची अशीच एक घटना घडली ती म्हणजे नोटांवर आणि ती लक्षात येण्यासाठीही 7 महिन्यांचा कालावधी लोटला. ऑस्ट्रेलियातील 50 डॉलर्सच्या नोटेवर टायपो एरर झाल्याची माहिती समोर आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ ऑस्ट्रेलियानेही गुरूवारी अधिकृतरित्या याची माहिती दिली.
बनावट नोटांना वापर रोखण्यासाठी आणि त्यावर आळा घालण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून ऑस्ट्रेलियाने 50 डॉलर्सच्या नोटांची छपाई केली. तसेच यामध्ये नव्या डिझाईनसह सुरक्षेच्या दृष्टीनेही त्यात योग्य ती काळजी घेण्यात आली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात या नोटांची छपाई करण्यात आली होती. परंतु नव्याने छापलेल्या 4.6 कोटी नोटांवर responsibility (रिस्पॉन्सिबिलिटी) शब्दाच्या स्पेलिंगमध्ये चुक झाली आहे. यामध्ये responsibility या ऐवजी responsibilty असा शब्द छापण्यात आला आहे. तब्बल 7 महिन्यांच्या कालावधीनंतर हा टायपो एरर सर्वांच्या नजरेस पडला आहे.
ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या महिला खासदार एडिथ कोवान यांनी संसदेत केलेल्या पहिल्या भाषणातील काही अंश या नोटांवर छापण्यात आला आहे. त्या भाषणातील एका स्पेलिंगमध्ये टायपो एरर झाला आहे. दरम्यान, रिझर्व्ह बँक ऑफ ऑस्ट्रेलियाने ही चूक मान्य केली असून यापुढे छपाई करण्यात येणाऱ्या नोटांमध्ये ही चूक सुधारली जाणार असल्याचे रिझर्व्ह बँक ऑफ ऑस्ट्रेलियाच्या प्रवक्तांकडून सांगण्यात आले. दरम्यान, या नोटा चलनातून बाहेर काढण्यावर कोणतीही माहिती देण्यात आली नाही.
ऑस्ट्रेलियामध्ये पॉलिमर नोटांचा वापर करण्यात येतो. अशा प्रकारच्या नोटा वापरणारा ऑस्ट्रेलिया हा पहिला देश आहे. कागदी नोटांच्या तुलनेत पॉलिमर नोटा अधिक सुरक्षित आणि जास्त काळ टिकणाऱ्या आहेत. ऑस्ट्रेलियात 50 डॉलर्सच्या नोटांचा सर्वाधिक वापर होत असल्याची माहिती रिझर्व्ह बँक ऑफ ऑस्ट्रेलियाकडून देण्यात आली. यापूर्वी रिझर्व्ह बँकेने 5 आणि 10 डॉलर्सच्या नव्या नोटा चलनात आणल्या आहेत. तर यावर्षी ऑक्टोबर महिन्यात 20 डॉलरची नवी नोट जारी करण्यात येणार आहे.