‘मोदी: दुफळी निर्माण करणारा नेता’; ‘टाइम’च्या कव्हरस्टोरीमधून पंतप्रधानांवर ताशेरे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/05/Modi-1.jpg)
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेतील जगप्रसिद्ध टाइम मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकले आहेत. मात्र यावेळी मोदींचा मुखपृष्ठावरील फोटो हा सकारात्मक लेखासंदर्भात नसून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख ‘टाइम’ने दुफळी निर्माण करणारा भारतातील प्रमुख नेता असा केला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी हिंदुत्वावर आधारित राजकारण करत असल्याने देशात ध्रुवीकरण झाल्याचा आरोप मोदींसंदर्भात लेख लिहिणाऱ्या आतिश तासीर यांनी केला आहे.
‘लोकप्रियतेमुळे कोलमडलेली लोकशाही म्हणून भारताचे नाव घेता येईल’ या वाक्याने लेखाची सुरुवात झाली आहे. ‘जगातील सर्वात मोठी लोकशाही मोदी सरकारला आणखीन पाच वर्ष देईल का?’ अशा मथळ्याखाली टाइम मासिकाच्या आशिया अवृत्तीमध्ये कव्हरस्टोरी छापण्यात आली आहे. या लेखामध्ये तुर्की, ब्राझील, ब्रिटन आणि अमेरिकेप्रमाणेच भारतातही लोकशाही मुल्यांपेक्षा एखाद्याची लोकप्रियता अधिक वाढल्याचे दिसत आहे असे लेखकाने म्हटले आहे. ‘लोकप्रियतेमुळे या आधी दुर्लक्षित केल्या जाणाऱ्या बहुसंख्याकांच्या भावनांना वाचा फोडण्याचे काम झाले आहे. मात्र त्याच वेळी यामुळे देशातील वातावरण निकोप व उत्साहवर्धक राहिलेले नाही,’ असंही तासीर यांनी या लेखात म्हटले आहे.
मोदींवर टिका करणाऱ्या या लेखामध्ये २०१४ च्या निवडणुकांनंतर देशामध्ये अनेक बदल झाल्याचे म्हटले आहे. एक राष्ट्र म्हणून भारताची वैशिष्ट्ये, भारताचे निर्माते, भारतातील अल्पसंख्यांक आणि देशातील संस्थांचा कारभार असं सर्वकाही विस्कळीत पद्धतीने मांडण्यात येत असल्याची टिका लेखकाने केली आहे. ‘स्वतंत्र भारताने मिळलेल्या सहिष्णुता, उदारमतवादी धोरण, स्वतंत्र प्रसारमाध्यमे यासारख्या गोष्टींही एखाद्या कटाचा भाग असल्याप्रमाणे २०१४ च्या निवडणुकांनंतर भासवले जात आहे,’ असे टीका तासीर यांनी केली आहे.
लेखक तासीर यांनी ‘नरेंद्र मोदी हे २००२ च्या गुजरात दंगलीनंतर शांत राहण्याचा निर्णय घेतल्याने ते एका ठराविक गटाच्या बाजूने झाले’ असंही आपल्या लेखात म्हटले आहे. तासीर यांच्या लेखाबरोबरच याच अवृत्तीमध्ये मोदी एक बदल घडवणारा नेता असाही लेख इयन बेरीमेर यांनी लिहिला आहे. या लेखाचा उल्लेखही मासिकाच्या मुखपृष्ठावर करण्यात आला आहे.
मागील काही वर्षांमध्ये टाइम मासिकाची मोदींबद्दलची भूमिका मोठ्या प्रमाणात बदलल्याचे पहायला मिळाले आहे. २०१४, २०१५ आणि २०१७ साली पंतप्रधान नरेंद्र मोदींचा समावेश ‘जगातील १०० सर्वात प्रभावशाली व्यक्ती’च्या यादीमध्ये करण्यात आला होता. मात्र २०१९ साली मोदींचा या यादीमध्ये समावेश करण्यात आला नाही हे विशेष.