लिंबू सरबत, उसाचा रस घातक
उघडय़ावरील विक्रीतील ८१ टक्के नमुने दूषित
मुंबई : उन्हाचा पारा वाढला की नागरिकांचा ओढा आपोआप लिंबू सरबत, उसाचा रस, लस्सी, ताक याकडे वळतो; परंतु उघडय़ावर विक्री केल्या जाणाऱ्या या पेयांचा नागरिकांच्या आरोग्याला धोका अधिक असल्याचे दिसून येत आहे. सरबतासाठी वापरले जाणारे पाणी दूषित असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाच्या पाहणीत आढळून आले आहे. या विभागाने एप्रिलमध्ये मुंबईतील २४ वॉर्डातील सरबतांचे नमुने तपासले असता त्यापैकी ८१ टक्के नमुने दूषित आढळून आले आहेत.
दर वर्षीप्रमाणे पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने एप्रिल महिन्यात २४ विभागांमधील फेरीवाल्यांकडील लिंबू सरबते आणि उसाच्या रसाच्या नमुन्यांची तपासणी केली होती. कुर्ला स्थानकातील लिंबू सरबत बनवतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पालिकेने सरबत, उसाचा रस आणि बर्फगोळा विक्रेत्यांवर धडक कारवाई सुरू केली. मार्च महिन्यातील तपासणीनंतर एप्रिल महिन्यातही तब्बल ८१ टक्के नमुने दूषित आढळल्याचे समोर आले आहे. मार्चमधील कारवाईत ८७ टक्के नमुने दूषित आढळले होते.
मुंबईमध्ये उन्हाचा तडाखा जाणवू लागल्यामुळे आणि त्यातच घामाच्या धारा वाहत असल्यामुळे सतत काही तरी सरबत पिण्याची इच्छा होत असते. त्यातूनच या काळात सरबते विकणाऱ्यांचा धंदा जोरात सुरू आहे. मात्र हे सरबत विक्रेते जे पाणी किंवा बर्फ वापरतात तो किती घातक आहे तेच या तपासणीवरून लक्षात येत आहे. खाद्य व पेय पदार्थ विकणाऱ्या फेरीवाल्यांकडील बर्फ हा ‘आइस फॅक्टरी’मध्ये तयार होत असल्याने त्याबाबत कारवाई करण्याचे अधिकार अन्न व औषध प्रशासन विभागाला असतात. त्यामुळे पालिका दर वर्षी केवळ नमुन्यांची तपासणी करून वास्तव मांडत असते. खाद्य व पेय पदार्थ विकणाऱ्या फेरीवाल्यांकडील पाणी नमुन्यांमध्ये व सरबतांमध्ये ई-कोलायबाधित नमुने मोठय़ा प्रमाणात आढळून आले आहेत.
पालिकेचे आवाहन
’ उघडय़ावरील अन्नपदार्थ खाऊ नका.
’ रस्त्यांवरील पाणी, सरबत, उसाचा रस अशी पेये टाळावीत.
’ पाणीपुरी-भेळपुरीचेही सेवन करू नये.
दूषित नमुने
’ लिंबू सरबतच्या २८० नमुन्यांपैकी २१८ नमुने दूषित
’ उसाचा रसाच्या ३०३ नमुन्यांपैकी २६८ दूषित
’ बर्फाच्या ३८५ नमुन्यांपैकी ३०० नमुने दूषित आढळले आहेत.