मतदान केंद्रावर जाण्यासाठी दिव्यांग व्यक्तींना ऑटो रिक्षांची सोय
पिंपरी – पुणे जिल्ह्यातील मावळ आणि शिरूर या लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्यातील मतदान आज पार पडत आहे. दोन्ही ही मतदार संघातील काही केंद्रावर दिव्यांग मतदारांना घेऊन जाण्यासाठी प्रशासनाकडून ऑटो रिक्षांची सोय करण्यात आली आहे. या रिक्षांमुळे दिव्यांग आणि जेष्ठ मतदारांना मतदान केंद्रावर जाण्यास मदत होत आहे.
पुणे जिल्ह्यातील मावळ आणि शिरूर या दोन मतदार संघामध्ये मतदान पार पडतं आहे. 23 एप्रिलला पुण्यात मतदान पार पडले होते. पुणेकरांनी दाखवलेल्या उदासीनतेमुळे अवघे 49 टक्के मतदान पुण्यात झाले. मतदान केंद्रावर जाण्यासाठी अनेकदा सुविधा नसल्यामुळे दिव्यांग आणि जेष्ठ नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो. मतदान केंद्रावर घेऊन जाण्यास कोणी नसल्यास असे मतदार मातदानापासून मुकतात. त्यामुळे या वेळेस प्रशासनाने खबरदारी घेतली असून, दिव्यांग आणि जेष्ठ नागरिकांसाठी ऑटो रिक्षाची सोय करण्यात आली आहे. शिरूर मतदार संघातील दिघी येथील मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांना घेऊन जाण्यासाठी 7 रिक्षांची सोय करण्यात आली आहे. आज दिवसभर ही सुविधा प्रशासनाकडून पुरवण्यात येणार आहे.