राज यांच्या सभांमधील ‘तथ्य तपासणी’ने भाजप अस्वस्थ
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/04/Raj-4.jpg)
महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभेची निवडणूक लढवत नसूनही पक्षाचे प्रमुख राज ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासकामांचे केलेले दावे चुकीचे आहेत हे चित्रफितीसह राज्यभर सभांमधून दाखविण्याचा प्रयत्न केला.
राज ठाकरे यांचे समर्थक त्यांच्या वक्तव्यामुळे मोहित असल्याचे यापूर्वी मुंबईत झालेल्या दोन सभांमुळे उघड झाले आहे. ‘ए लाव रे तो व्हिडीओ’, ही शैली प्रसिद्ध झाली. चित्रफीत लावण्यापूर्वी राज ठाकरे गर्दीला उद्देशून ‘नीट बघा’ असे म्हणतात. त्यानंतर प्रोजेक्टर सुरू होतो आणि मोदी यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्याबाबतच्या बदलत्या भूमिकेपासून तर व्यापारी हा सैनिकापेक्षा अधिक शूर असतो असे सांगणाऱ्या चित्रफिती दाखविल्या गेल्या. दृक्श्राव्य माध्यमांतून वस्तुस्थिती मांडल्यावर मोठा प्रभाव पडतो, असे मनसेचे नेते संदीप देशपांडे म्हणाले.
राज ठाकरे हे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा लाभ करून देऊ इच्छित असल्याचे सांगून भाजपने त्यांच्या हेतूंवर शंका घेतली आहे. या सभांचा खर्च काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या खात्यांमध्ये जोडला जावा अशी मागणी त्यांनी केली आहे. तर आपण फक्त कार्यकर्त्यांना या वर्षी होणार असलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी तयार करत असल्याचे ठाकरे यांचे म्हणणे आहे.
६ एप्रिलला शिवाजी पार्कवर झालेल्या सभेत मनसेने मोदी हे मतदारांनी त्यांची मते बालाकोटच्या हवाई हल्ल्यातील सैनिकांना समर्पित करताना सांगत असल्याची चित्रफीत दाखविली. ठाकरे यांनी त्या वेळी विचारले : ‘त्यांना सैनिकांबद्दल नेमके काय वाटते हे तुम्हाला माहीत आहे का? आता बघा..’ यानंतर दाखवलेल्या व्हिडीओत फेब्रुवारी २०१४ मधील एका कार्यक्रमात मोदी म्हणतात: ‘व्यापाऱ्याजवळ एखाद्या सैनिकापेक्षा शूर असण्याची क्षमता असते.’ दिल्लीत व्यापारी संघटना महासंघाला मार्गदर्शन करताना यशस्वी होण्यासाठी व्यापाऱ्याला धोका पत्करणे आवश्यक असल्याचे मोदी सांगत होते. आम्हाला सैनिकांबद्दल काय वाटते याबाबत पंतप्रधानांना मनसेच्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. देशातील लोक आणि सैनिक यांना याबद्दल माहिती आहे, असे भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी सांगितले.