हिमालय पूल दूर्घटनेप्रकरणी कार्यकारी अभियंत्याला कोठडी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/04/bridge-4.jpg)
मुंबई : हिमालय पूल दुर्घटनेप्रकरणी अटकेत असलेल्या महापालिकेच्या कार्यकारी अभियंता अनिल पाटील यांना न्यायालयाने बुधवारी ५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
पाटील यांनी कर्तव्यकसुरी केली नसती तर अपघात टळला असता, असा दावा पोलिसांनी न्यायालयात केला. खासगी कंत्राटदारामार्फत पुलाची संरचनात्मक तपासणी सुरू असताना तेथे प्रत्यक्ष हजर असणे, तपासणीवर देखरेख ठेवणे अभियंत्यांना बंधनकारक होते. हाताखालील अभियंते हजर आहेत का, नेमून दिलेले कर्तव्य चोखपणे बजावत आहेत का, याची पाटील यांनी खातजमा करणे अपेक्षित होते. तशा सूचना देणे आवश्यक होते. मात्र तसे त्यांनी केले नाही. ते स्वत:ही तपासणीत गैरहजर राहिले, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयाला दिली.
ही तपासणी करणारे निरज देसाई यांनी केलेल्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू आहे. बुधवारी त्यांच्यावतीने युक्तिवाद पूर्ण झाला. त्यात पूल अपघातात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही. अन्य आरोपींना वाचविण्यासाठी पोलिसांनी विनाकारण गोवल्याचा दावा देसाई यांच्या वकिलांनी केला.