राम मंदिर प्रकरणाचा निकाल विरोधात गेल्यास हिंदू आंदोलने करतील-विष्णू कोकजे
नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिर प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल विरोधात गेल्यास देशभरात आंदोलने होतील, असे विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष विष्णू कोकजे यांनी म्हटले आहे. न्यायालयाने भावना दुखावणारा निकाल दिल्यास, अयोध्येत राम मंदिराची उभारणी करण्याचा कायदा संमत करण्यासाठी देशभरातील हिंदू आंदोलने करुन त्यांच्या खासदारांवर दबाव आणतील, असेही त्यांनी म्हटले आहे. विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर प्रथमच कोकजे यांनी हरिद्वारला भेट दिली. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
सर्वोच्च न्यायालयात असलेला राम जन्मभूमी प्रकरणाचा खटला लवकरच निकाली निघेल, अशी अपेक्षा कोकजे यांनी व्यक्त केली. ‘सर्वोच्च न्यायालयाचा निकाल कोट्यवधी हिंदूंच्या अपेक्षेप्रमाणे लागेल, असा विश्वास विश्व हिंदू परिषदेच्या कायदेतज्ज्ञांना वाटतो,’ असेही कोकजे यांनी म्हटले. न्यायालयाचा निकाल श्रद्धेच्या विरोधात गेल्यास देशभरातील हिंदू आंदोलनं सुरू करतील आणि आपापल्या खासदारांवर दबाव आणून त्यांना अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी कायदा संमत करायला लावतील, असे कोकजे यांनी म्हटले. कोकजे यांच्या या विधानामुळे वाद होण्याची शक्यता आहे.