डीएसकेंची मालमत्ता जप्त होणार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/dsk.jpg)
- अधिसूचना जारी
- सर्वाधिक जमीन फुरसुंगी येथे
पुणे- ठेवीदारांकडून स्वीकारलेल्या रकमा विहित मुदतीमध्ये परत करण्यास कसूर केल्याबद्दल बांधकाम व्यावसायिक डी.एस.कुलकर्णी (डीएसके) आणि त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्या मालमत्ता जप्तीच्या आदेशाची अधिसूचना शासनाने प्रसिद्ध केली आहे. यामध्ये 124 ठिकाणी असलेल्या जमिनी, विविध कंपनीच्या नावे आणि वैयक्तिक अशी एकूण 276 बॅंकांमध्ये असलेले खाते आणि 46 आलिशान चारचाकी अणि दुचाकी वाहनांचा समावेश आहे.
डीएसके दाम्पत्याने अनेक ठेवीदारांकडून स्वीकारलेल्या ठेवी मुदतपूर्तीनंतर परत केल्या नाहीत, अशा तक्रारी बहुतांश ठेवीदारांकडून प्राप्त झालेल्या आहेत. त्यामुळे डीएसके यांच्याविरुध्द शिवाजीनगर, कोल्हापूर, मुंबई येथील पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थामधील हितसंबंधाचे) संरक्षण अधिनियम 1999 नुसारही गुन्हे दाखल केलेले आहेत. त्यामुळे शासनाने यापूर्वी डीएसकेंच्या मालमत्ता शोधण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानुसार प्रशासनाने मालमत्ता शोधून त्यांची यादी शासनाकडे पाठविली होती. त्यामुळे शासनाने डीएसके यांच्या मालमत्ता जप्तीची अधिसूचना प्रसिध्द केली आहे. ही अधिसूचना गृह विभागाकडून प्रसिध्द करण्यात आली आहे.
जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांमध्ये जमिन, वाहने, बॅंकेतील रकमा यांचा समावेश आहे. या मालमत्ता हा ठेवीदारांच्या पैशातून संपादित करण्यात आल्या असल्याचे यामध्ये नमूद करण्यात आले आहे. सर्व ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत करण्याची शक्यता नाही त्यामुळे राज्य शासनाला अशा ठेवीदारांच्या हितसंबंधाचे रक्षण करावे लागेल. या जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी मुळशी-मावळचे उपविभागीय अधिकारी यांची सक्षम प्राधिकारी म्हणून शासनने नियुक्ती केली आहे.
124 ठिकाणी जमिनी, 276 बॅंक खाते, 46 वाहनांची जप्ती
अधिसूचनेमध्ये जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेचा तपशील देण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने 124 ठिकाणच्या जमिनींचा समावेश आहे. यामध्ये सर्वाधिक जागा हा फुरसुंगी येथील आहे. फुरसुंगीमध्ये 107 ठिकाणच्या जागा आहेत. तर महाबळेश्वर, बाणेर, पेरणे, रत्नागिरी, मिरज, मालेगाव आणि पुरंदर या ठिकाणच्या या जमिनी आहेत. तर कंपनीच्या नावे आणि वैयक्तिक अशी एकूण 276 बॅंक खाते डीएसके यांच्याकडे आहे. त्याचबरोबर दुचाकी सात तर चारचाकी 39 अशी एकूण 46 वाहने आहेत. यामध्ये बीएमड्ब्लू, ऑडी, लॅन्ड क्रूझर, फॉरच्यूनर, इनोव्हा, स्कॉर्पिओ या चारचाकी गाड्यांचा समावेश आहे. ही वाहनेही जप्त करण्यात आली आहेत.