पंतप्रधान मोदी नेपाळ दौऱ्यावर रवाना
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नेपाळ दौऱ्यावर रवाना झाले. नेपाळचे पंतप्रधान माननीय के.पी.शर्मा ओली यांच्याकडून आलेल्या निमंत्रणानुसार मोदी दोन दिवसांसाठी नेपाळला गेले आहेत. पंतप्रधान म्हणून मोदींची ही तिसरी नेपाळ भेट आहे.
गेल्या महिन्यात पंतप्रधान ओली यांनी भारत दौरा केला होता. तेंव्हा ओली यांनी मोदी यांना नेपाळ भेटीचे निमंत्रण दिले होते. केंद्र सरकारच्या शेजारी देशांबरोबरच्या मैत्रीच्या धोरणाचाच एक भाग म्हणून उभय देशात उच्चस्तरीय चर्चा नियमितपणे होत आहेत. गेल्या काही वर्षात भारत आणि नेपाळ दोन्ही देशांनी संयुक्तपणे काही प्रकल्पांचे काम केले आहे. काही प्रकल्पांचे कार्य प्रगतीपथावर आहे.
अलिकडेच नवी दिल्लीमध्ये पंतप्रधान ओली आणि मोदींमध्ये उभय देशांच्या दृष्टीने हितावह अशा अनेक विषयांवर विस्तृत चर्चा झाली. या चर्चेतून सहकारी भागीदारीतून वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कार्य करण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यात येईल.
काठमांडूबरोबरच या दौऱ्यात मोदी जनकपूर आणि मुक्तीनाथ येथे भेट देणार आहेत. या दोन्ही स्थळांना दरवर्षी खूप मोठ्या संख्येने भाविक भेट देत असतात. या दौऱ्यामध्ये मोदी नेपाळमधल्या राजकीय नेत्यांची भेट घेणार आहेत.





