लाच घेताना महावितरणचा अभियंता एसीबीच्या जाळ्यात
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/06-440x264.png)
पिंपरी – वीज बिलाचे कनेक्शन मंजूर करुन देण्यासाठी महावितरणच्या सहायक अभियंत्यासह अन्य एकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई भोसरीतील महावितरणच्या कार्यालया जवळ करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या भोसरी शाखेतील सहायक अभियंता रोहित अशोक डामसे (वय-31, रा. स.नंबर आर/102, मयूरनगरी, फेज 3 पिंपळे गुरव, पुणे.) आणि आशिष जगन्नाथ देसाई (वय-33, रा. देवकर पॅलेस, भोसरी पुणे) अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे एक्स सर्व्हिसमन आहेत. त्यांनी एक्स सर्विसमन कॉर्पोरेशन लिमिटेड, मध्ये वर्कशॉपसाठी गाळा घेतला आहे. या गाळ्यासाठी थ्री फेज कनेक्शनमध्ये नवीन विद्युत जोडणीसाठी त्यांनी अर्ज केला होता. हे कनेक्शन मंजूर करून देण्यासाठी खाजगी इसम देसाई याने सहायक अभियंता डामसे याच्यासाठी 35 हजार रुपये लाचेची मागणी केली होती.
तक्रारदाराने याविषयी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. भोसरी येथील महावितरणच्या कार्यालयाजवळ यातील पहिला हप्ता (10 हजार रुपये) देण्याचे ठरले होते. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून आशिष देसाई याला अभियंता डामसे आणि स्वतःसाठी लाच घेताना रंगेहाथ पकडले.