IPL 2018 : राजस्थानला आज पंजाबविरुद्ध चमत्काराचीच गरज
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/kxip-vs-rr-.jpg)
पुनरागमनासाठी अखेरची संधी
जयपूर – सलग तीन पराभवांमुळे गुणतालिकेत तळाच्या स्थानावर असलेल्या राजस्थान रॉयल्स संघाला आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पुनरागमनासाठी चमत्काराचीच गरज आहे. त्यातच चमकदार विजयांची नोंद करून तिसऱ्या स्थानावर झेप घेतलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाब संघाविरुद्ध आज होणारी लढत राजस्थानसाठी “जिंकू किंवा मरू’ अशीच ठरणार आहे. या सामन्यात पराभव झाल्यास राजस्थानचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले असल्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. या दोन संघांमध्ये कालच पहिल्या फेरीची लढत झाली होती. त्यात पंजाबने सहा गडी राखून विजय मिळविला होता. या सामन्यात राजस्थानकडून फलंदाज व गोलंदाज या दोघांनीही निराशाजनक कामगिरी केली होती. त्यामुळेच आजच्या सामन्यात आपल्या कामगिरीत लक्षणीय सुधारणा करण्याचे आव्हान राजस्थानच्या खेळाडूंना पेलावे लागणार आहे.
दहा वर्षांपूर्वी महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली पहिल्यावहिल्या आयपीएल स्पर्धेत विजेतेपद पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्स संघासाठी यंदाच्या मोसमात काहीच चांगले घडलेले नाही. नियमित कर्णधार स्टीव्हन स्मिथ याच्यावर बॉल टॅम्परिंग प्रकरणी बंदी घालण्यात आल्यामुळे तो यंदाच्या मोसमात खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट झाल्यावर राजस्थानने जणू काही आपल्या कामगिरीतील धारच गमावली.
राजस्थानने त्यानंतर तीन सामने जिंकले खरे. परंतु त्यातून फारसे काही हाती लागलेले दिसले नाही. आता बाद फेरीसाठी पात्र ठरण्याकरिता उरलेले सर्व सामने जिंकण्याच्या अशक्यप्राय कामगिरीबरोबरच इतर सामन्यांमधील निकाल आपल्या बाजूने लागावेत, अशी आशा करण्यापलीकडे राजस्थानच्या हाती फारसे काही नाही. कर्णधार अजिंक्य रहाणे व महागडा बेन स्टोक्स यांच्या सुमार कामगिरीबरोबरच राहुल त्रिपाठीनेही निराशाच केली आहे. जयदेव उनाडकत अत्यंत महागडा ठरला असून त्याला बळीही घेता आलेले नाहीत. विंडीजचा गोलंदाज जेप्रा आर्चर हा राजस्थानचा एकमेव सकारात्मक खेळाडू ठरला आहे.
प्रतिस्पर्धी संघ –
किंग्ज इलेव्हन पंजाब – रविचंद्रन अश्विन (कर्णधार), अक्षर पटेल, लोकेश राहुल, अँडयू टाय, ऍरॉन फिंच, मार्कस स्टॉइनिस, करुण नायर, मुजीब उर रेहमान, अंकित सिंग राजपूत, डेव्हिड मिलर, मोहित शर्मा, बारिंदर सिंग स्रान, युवराज सिंग, ख्रिस गेल, बेन ड्वारशुईस, अक्षदीप नाथ, मनोज तिवारी, मयंक आगरवाल, मंझूर दर, प्रदीप साहू व मयंक डागर.
राजस्थान रॉयल्स – अजिंक्य रहाणे (कर्णधार), अंकित शर्मा, संजू सॅमसन, बेन स्टोक्स, धवल कुलकर्णी, जोफ्रा आर्चर, डीआर्की शॉर्ट, दुश्मंथा चमीरा, स्टुअर्ट बिन्नी, श्रेयस गोपाल, एस. मिथुन, जयदेव उनाडकत, बेन लाफलिन, प्रशांत चोप्रा, कृष्णप्पा गौतम, महिपाल लोमरोर, जतिन सक्सेना, अनुरीत सिंग, आर्यमान बिर्ला, जोस बटलर, हेन्रिच क्लासेन, झहीर खान आणि राहुल त्रिपाठी.