हवाईत ज्वालामुखीचा उद्रेक-200 फूट उंच लाव्हा उसळला
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/usa-volcano.jpg)
वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेच्या हवाई राज्यातील किलाउआ ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे. ज्वालामुखीतून 200 फूट उंच लाव्हा उसळत आहे. लाव्ह्यामुळे 31 घरे नष्ट झाली आहेत. ज्वालामुखीच्या परिसरातील 1700 पेक्षा अधिक जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून 10,000 पेक्षा अधिक लोकांना सुरक्षितस्थळी जाण्यास सांगितलेली आहे. या आकडेवारीत फरक पडण्याची, ती वाढण्याची मोठीच शक्यता असल्याची माहिती वेंडी सॅंड्र यांनी दिली आहे.
नष्ट झालेली घरे लीलानी इस्टेट परिसरातील असल्याची माहिती हवाईचे प्रवक्ता जेनेट सिंडर यांनी दिली आहे. ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर ठिकठिकाणी जमीन खचली असून त्यातून विषारी वायू आणि वाफ बाहेर पडत आहे. स्थलांरित करण्यात आलेल्या लोकांना पुन्हा आपल्या मूळ जागी इतक्या लवकर परतण्याची शक्यता नसल्याचे सांगण्यात आले आहे.
अमेरिकन जियॉलॉजिकल सर्वेचे व्होल्कॅनॉलॉजिस्ट वेंडी स्टोवेल यांनी म्हटले आहे, की ज्वालामुखीतून मोठ्या प्रमाणावर विषारी वायू आणि वाफ बाहेर पडत आहे. त्यातून बाहेर पडणाऱ्या सल्फर डाय ऑक्साईडमुळे नाक आणि घशाची जळजळ होऊ लागते.
ज्वालामुखीची एकूण आठ मुखे खुली झाल्याची आणि त्यातून लाव्हा, विषारी वायू आणि वाफा बाहेर उसळत असल्याची माहिती वेधशाळेने दिली आहे. ज्वालामुखीचा उद्रेक होण्यापूर्वी 24 तासात या भागाला भूकंपाचे सुमारे 250 धक्के बसले आहेत. माऊंट किलाउआ ज्वालामुखी हा जगातील अत्यंत जागृत ज्वालामुखींपैकी एक ज्वालामुखी आहे.