उमेदवार पार्थ पवार यांच्या दुचाकी रॅलीला तरुणांचा प्रतिसाद

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – मावळ लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ अजित पवार यांच्या प्रचारार्थ गुरूवारी (दि. 28) सायंकाळी शहरातून दुचाकी रॅली काढण्यात आली. रॅलीला पार्थ यांच्या चाहत्यांचा उदंड प्रतिसाद लाभला.
पार्थ पवार यांच्या दुचाकी रॅलीची सुरूवात पिंपरी गावातून झाली. राष्ट्रवादीचे संजोग वाघेरे यांच्या दुचाकीवर पार्थ पवार बसले होते. बाजुला युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष विशाल वाकडकर, नगरसेवक विनोद नढे दुस-या दुचाकीवर होते. त्याचबरोबर माजी नगरसेवक काळूराम पवार, युवा नेते कुनाल थोपटे, सागर तापकीर आदी यांच्यासह शेकडो तरुण रॅलीत सहभागी होते. ही रॅली पिंपरी गावठाणातून जय हिंद स्कूल, मुख्य बाजापेठ, साई चौक, शगुन चौक, चिंचवड लिंक रोडने पुढे पीसीएमटी चौकाकडे मार्गस्त झाली. युवक राष्ट्रवादीने आयोजन केले होते.
चिंचवड येथील चापेकर चौकात पार्थ यांची घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली. घोड्यावर स्वार होऊन त्यांनी लोकांना नमस्कार केला. त्यांच्या पाठोपाठ दुचाक्या मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या. दुचाकी रॅली आणि घोड्यावरून मिरवणूक काढल्याने पिंपरी-चिंचवडमध्ये ही प्रचाराची नांदी ठरली. “पार्थ पवार तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है…” अशा घोषणा चाहत्यांनी दिल्या.




