नरेंद्र मोदी गरीब विरोधी, म्हणूनच काँग्रेसच्या योजनेला विरोध – राहूल गांधी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/03/Narendra-modi-rahul-gandhi-1-1-1.jpg)
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने पुन्हा एकदा ‘गरिबी हटाव’चा नारा दिला असून देशातील सर्वाधिक गरीब असलेल्या २० टक्के कुटुंबांना वर्षांला प्रत्येकी ७२ हजार रुपये देण्याची घोषणा पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी केली. दरम्यान काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेत या घोषणेसंबंधी काही गोष्टी स्पष्ट करत टीका करणाऱ्या भाजपा नेत्यांना उत्तर दिलं आहे. हे पैसे कुटुंबातील महिलेच्या खात्यात जमा होणार असल्याचं रणदीप सुरजेवाला यांनी स्पष्ट केलं आहे. नरेंद्र मोदी गरीब विरोधी असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.
महिलांना केंद्रस्थानी ठेवून ही योजना आखण्यात आली आहे. कुटुंबातील महिलेच्या बँक खात्यात काँग्रेस पक्ष ७२ हजार रुपये जमा करणार अशी माहिती रणदीप सुरजेवाला यांनी दिली. तसंच ही टॉप अप स्किम नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. शहर आणि गावांमध्ये कोणताही भेदभाव केला जाणार नाही. देशभरातील सर्व गरिबांना ही योजना लागू असणार आहे. गरिबी मिटवण्यासाठी ही जगातील सर्वात मोठी योजना आहे असं रणदीप सुरजेवाला यांनी सांगितलं.
यावेळी रणदीप सुरजेवाला यांनी मोदी सरकार गरिबांना मिळत असणाऱ्या पैशांचा विरोध का करत आहे ? असा सवाल विचारला. नरेंद्र मोदी काही श्रीमंतांचे पैसे माफ करु शकतात पण गरिबांना ७२ हजार रुपये मिळालेले चालत नाही. नरेंद्र मोदी 10 लाखांचा सूट घालू शकतात आणि तो चार कोटींमध्ये विकू शकतात. मग गरिबांना 72 हजार रुपये देण्याला विरोध कशासाठी ? अशी विचारणा त्यांनी केली.
भाजपा नेहमीच गरिबांच्या विरोधात उभी राहिली आहे. मोदींनी पंतप्रधान होताच शेतकऱ्यांची कर्जमाफी चुकीचं असल्याचं सांगितलं. मोदींनी पंतप्रधान होताच आदिवसींचे अधिकार काढून घेतले अशी टीका रणदीप सुरजेवाला यांनी केली. नरेंद्र मोदी प्रचारासाठी पाच हजार कोटी खर्च करतात. परदेश दौऱ्यावर दोन हजार कोटी खर्च करतात असं सांगताना भाजपाचे बोगस ब्लॉग मंत्री खोटा प्रचार करत आहेत असा टोला अरुण जेटली यांचं नाव न घेता लगावण्यात आला.
देशात २१व्या शतकातही गरिबी असावी हे काँग्रेसला मान्य नाही. त्यामुळेच काँग्रेसची सत्ता आल्यानंतर देशातील गरिबांना किमान उत्पन्नाची हमी देणारी योजना राबवली जाईल. त्यातून पाच कोटी कुटुंबांची आणि २५ कोटी लोकांची दारिद्रय़ातून मुक्तता होईल, असा दावा राहुल यांनी पत्रकार परिषदेत केला. दरमहा १२ हजार रुपयांपेक्षाही कमी उत्पन्न असलेल्या २० टक्के गरीब कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळेल. वार्षिक ७२ हजार रुपये म्हणजेच दरमहा किमान सहा हजार रुपये गरीब कुटुंबांना दिले जातील, असे आश्वासन राहुल यांनी दिले. किमान उत्पन्न हमी योजना ही काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील प्रमुख घोषणा असेल. काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत सोमवारी जाहीरनाम्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी या योजनेची माहिती दिली.