युती पॅटर्न, शिवसेनेला हवा पुणे महापालिकेतील सत्तेचा वाटा
पुणे – लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि शिवसेची युती झाल्याने, महापालिकेत शिवसेनेविना एकहाती सत्ता असलेल्या भाजपची चांगलीच कोंडी झाली आहे. उपमहापौरपदासह एक वर्षासाठी स्थायी समिती अध्यक्षपद आणि काही विषय समित्यांची अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांची मागणी भाजपकडे करण्यात आली आहे.
महापालिका निवडणुकीत भाजप व शिवसेना हे दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले. त्यात भाजपने एकहाती सत्ता मिळविली, तर शिवसेनेचे दहा नगरसेवक निवडून आले. त्यामुळे शिवसेनेला विरोधी बाकावर बसावे लागले होते. मात्र, आता राज्य पातळीवर हे दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत. स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भाजपचा अर्ज भरण्यासाठी शिवसेनेच्या नगरसेवकांनी हजेरी लावली होती. तसेच मागील मुख्यसभांमध्ये वादांच्या विषयावर शिवसेनेने भाजपच्या पारड्यात मतदान केलेले आहे. त्यामुळे आता शिवसेनेला थेट सत्तेतच वाटा हवा आहे. शिवसेनेचे गटनेते संजय भोसले यांनी याबाबत महापौर मुक्ता टिळक यांना पत्र दिले असून त्यात पुढील अडीच वर्षांसाठी उपमहापौरपद, एक वर्षासाठी स्थायी समितीचे अध्यक्षपद, चार विषय समित्यांपैकी प्रत्येक वर्षी दोन समित्यांचे अध्यक्ष व उपाध्यक्षपद आणि एका प्रभाग समितीचे अध्यक्षपद अशा विविध पदांची मागणी केली आहे.