पिंपरी चिंचवड शहरात 78 इंग्रजी शाळा बंदमध्ये सहभागी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/02/8bc159dd14c32b0d171743b3cebc8fbd.jpg)
पिंपरी ( महा ई न्यूज ) – आरटीई थकीत शुल्क परताव्यासाठी इन्डिपेंडंट इंग्लिश स्कूल असोसिएशनने (आयईएसए) सोमवारी (ता. 25) पुकारलेल्या एकदिवसीय “शाळा बंद’ आंदोलनाला शहरातून संमिश्र प्रतिसाद मिळाला. असोसिएशनशी निगडित 119 शाळांपैकी 78 शाळांनी बंद पाळला, अशी माहिती असोसिएशनचे राजेंद्र सिंग यांनी दिली.
शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीपासून खासगी इंग्रजी माध्यमांच्या शिक्षण संस्थाचालकांनी “शाळा बंद’ आंदोलनाचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, हा बंद पाळण्यात आला. काही शाळांमध्ये सीबीएसई बोर्डाची वार्षिक परीक्षा सुरू असल्याने शहरातील बहुतांश शाळांनी “बंद’मध्ये सहभाग घेतला नाही. त्याबाबत त्यांनी असोसिएशनला पूर्वकल्पनाही दिली होती. तथापि, अन्य शाळांनी “बंद’ला प्रतिसाद दिला. संस्थाचालकांनी पुण्यातील शिक्षण संचालनालय व जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा काढला. “बंद’च्या इशाऱ्यामुळे पालक, विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम होता. त्याचा विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर परिणाम झाला.
…या आहेत मागण्या
– सर्व शाळांसाठी शाळा संरक्षण कायदा करण्यात यावा.
– एक नोव्हेंबर 2018मध्ये नमूद केल्याप्रमाणे शाळांचे निरीक्षण व कठोर प्रक्रिया मागे घ्यावी.
– 18 नोव्हेंबर 2013च्या शासन आदेशामध्ये दुरुस्ती करण्यात यावी.
– शालेय विद्यार्थी वाहतूक संदर्भामध्ये मुख्याध्यापकांऐवजी शाळेने नियुक्त केलेल्या वाहतूक व्यवस्थापकावर जबाबदारी सोपवण्यात यावी.
– स्वयंअर्थसहायित तत्त्वावर दर्जावाढ प्रस्तावासाठी ऑनलाइन प्रक्रिया तातडीने सुरू करावी.
– मोफत पुस्तके, स्कूल बॅग, गणवेश, इतर साहित्य सरकारने उपलब्ध करून द्यावे.