पाकिस्तानकडून भारतावर सायबर हल्ला; मुख्तार अब्बास नकवी, छत्तीसगड भाजपासहित १०० वेबसाइट हॅक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/02/Hacking.jpg)
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या तणाव सुरु आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी हॅकर्सने केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी आणि छत्तीसगड भाजपाच्या वेबसाइटसहित एकूण १०० वेबसाइट हॅक केल्या आहेत. हॅकर्सनी वेबसाइटवर आम्ही पाकिस्तानी सायबर अटॅकर्स असल्याचा संदेश लिहिला आहे. यासोबतच हॅकर्सनी काश्मीरला स्वतंत्र करण्यासंबंधीही लिहिलं आहे.
यावर प्रतिक्रिया देताना छत्तीसगड भाजपाचे आयटी सेल प्रमुख डी माश्के यांनी सांगितलं आहे की, ‘या सायबर हल्ल्यात १०० हून जास्त वेबसाइट्स हॅक करण्यात आल्या आहेत. आमची वेबसाइट त्यापैकी एक आहे. आम्ही यासंबंधी तक्रार दाखल केली आहे. पाकिस्तान समोर येऊन लढू शकत नाही म्हणूनच या मार्गाचा अवलंब करत आहे’.
मुख्तार अब्बास नकवी यांची वेबसाइटही हॅक झाली असून त्यांनी म्हटलं आहे की, ‘ज्या देशाचा मेंदू दहशतवाद्यांनी हॅक केला आहे तेच अशा प्रकारचं कृत्य करु शकतात. त्यांचा चेहरा जगासमोर उघड पडला आहे आणि जगभरात एकटे पडले आहेत’.
गेल्या शनिवारी पाकिस्तानचं वृत्तपत्र डॉनने वृत्त दिलं होतं. यामध्ये पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाची वेबसाइट हॅक झाल्याचा दावा करण्यात आला होता. पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाची वेबसाइट पाकिस्तानात योग्य पद्धतीने सुरु होती, मात्र इतर देशातून लॉग इन करताना समस्या होत होती. काही रिपोर्ट्समध्ये पाकिस्तान लष्कराची वेबसाइटही हॅक झाल्याचा दावा करण्यात आला होता. पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाने याचं खापर भारतावर फोडत त्यांनीच हॅकिंग केल्याचा आऱोप केला होता.