शाळकरी मुलाचे दोरीने हात बांधून शिक्षा, प्राचार्यांसह वर्गशिक्षिकेवर गुन्हा
इंग्रजी माध्यमातील शाळेत दुसऱ्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्याार्थ्याचे दोरीने हात बांधून शिक्षा देण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून शाळेच्या प्राचार्यांसह वर्ग शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात शालेय प्रशासनाला जाब विचारणाऱ्या क्रीडा शिक्षकाला कामावरून कमी करण्यात आले होते.
संबंधित शिक्षकाने महिला व बाल विकास मंत्रालयाला मुलाला देण्यात आलेल्या शिक्षेचे छायाचित्र पाठविले होते. त्यानंतर मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या आदेशानंतर पोलिसांनी चौकशी करून गुन्हा दाखल केला. या प्रकरणी कोंढवा भागातील मनसुखभाई कोठारी इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील प्राचार्या प्रज्ञा गोखले आणि वर्ग शिक्षिका हबिबा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. शाळेतून कमी करण्यात आलेले क्रीडा शिक्षक अनिकेत सातव (वय २८, रा. सहकारनगर) यांनी याबाबत तक्रार दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातव हे कोंढवा भागातील मनसुखभाई कोठारी शाळेत क्रीडाशिक्षक होते. १ नोव्हेंबर २०१८ रोजी दुसरीच्या वर्गातील मुलांचा खेळाचा तास होता. मुले मैदानावर आली. तेव्हा एका मुलाचे हात दोरीने बांधण्यात आले होते. सातव यांनी मुलाच्या हाताला बांधलेली दोरी सोडली आणि त्याला वर्गात पाठविले. त्याच्याकडे विचारणा करण्यात आली. तेव्हा वर्गशिक्षिकेने हात बांधल्याचे मुलाने सातव यांना सांगितले. क्रीडा शिक्षक सातव पुन्हा वर्गात गेले. तेव्हा मुलाचे हात पुन्हा बांधण्यात आले होते. या घटनेनंतर सातव यांनी प्राचार्या गोखले यांच्याकडे विचारणा केली. तेव्हा मुलगा वर्गात त्रास देत असल्याने त्याचे हात बांधण्यात आले. या प्रकाराची कुठे वाच्यता करू नका, असे गोखले यांनी सातव यांना सांगितले.
या घटनेनंतर काही दिवसांनी सातव यांना कोणतेही कारण न देता शाळेतून कमी करण्यात आले. दरम्यान, सातव यांनी ५ फेब्रुवारी रोजी महिला आणि बाल विकास मंत्रालयाला या घटनेचे छायाचित्र इ-मेल केले. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन चौकशी करण्याचे आदेश मंत्रालयाकडून पोलिसांना देण्यात आले. कोंढवा पोलीस तसेच शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी शाळेत जाऊन चौकशी केली. त्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक विष्णू वाडकर यांनी दिली.