मावळातील गुलाब परदेशात
देश-परदेशात सव्वा ते दीड कोटी फुलांची विक्री होणार; ‘व्हॅलेंटाइन डे’साठी वाढती मागणी
लोणावळा : प्रेमाचे प्रतीक म्हणजे गुलाबाचे फूल. जागतिक प्रेम दिन म्हणजेच ‘व्हॅलेंटाइन डे’साठी मावळ तालुक्यातील गुलाब फुलांना परदेशातून तसेच स्थानिक बाजारातून मोठी मागणी येत आहे. यंदा देशात आणि परदेशात मिळून सव्वा ते दीड कोटी गुलाबाची फुले पाठविण्याचे लक्ष्य मावळातील फूल उत्पादक शेतक ऱ्यांनी ठेवले आहे.
‘व्हॅलेंटाइन डे’साठी मावळ तालुक्यातून परदेशातील बाजारपेठेत ५० लाख तसेच स्थानिक बाजारपेठेत ८० लाख गुलाब फुले पाठविण्यात येणार आहेत. पुढील दोन दिवसांत परदेशातील बाजारपेठेत मावळातील गुलाब फुले विमानाने पाठविण्यात येणार असल्याची माहिती पवना फूल उत्पादक संघाचे अध्यक्ष मुकुंद ठाकर यांनी दिली.
टॉप सिक्रेट नावाच्या लाल रंगाच्या गुलाबाला परदेशातील बाजारपेठेतून मोठी मागणी आहे. मावळ तालुक्यात साडेसहाशे एकर क्षेत्रावरील हरितगृहात परदेशात तसेच देशात पाठविण्यात येणाऱ्या फुलांचे उत्पादन घेण्यात येते. गेल्या काही वर्षांपासून मावळ तालुक्यातील गुलाब फुलांना परदेशातून मोठी मागणी आहे. यंदा थंडीचा कडाका असल्याने फूल उत्पादनावर काहीसा परिणाम झाला. त्यामुळे फुले पक्व होण्यास काहीसा विलंब झाला.
डिसेंबरपासून नियोजन
मावळ तालुक्यातील शेतकरी वर्षभर फुलांचे उत्पादन घेतात. १४ फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाइन डे असतो. या काळात गुलाब फुलांना मोठी मागणी असते. त्यामुळे या काळात गुलाब फुलांचे उत्पादन घेण्याचे नियोजन केले जाते. फुलांची वाढ, औषध फवारणी, छाटणी या कामांवर शेतकऱ्यांचे विशेष लक्ष असते. २५ जानेवारी ते ८ फेब्रुवारी या कालावधीत परदेशात गुलाब फुले पाठविली जातात. त्यानंतर स्थानिक बाजारपेठेत फु ले विक्रीसाठी पाठविली जातात.
विक्रीची स्वतंत्र यंत्रणा
परदेशात एका गुलाब फुलाला १२ ते १३ रुपये भाव मिळत आहे. स्थानिक बाजारपेठेत ८ ते ९ रुपये असा भाव मिळतो. मावळातील चंद्रकांत कालेकर, ज्ञानेश्वर ठाकर, ज्ञानेश्वर आडकर, विश्वनाथ जाधव आणि मुकुंद ठाकर यांनी एकत्र येऊन परदेशातील बाजारपेठेत फुले विक्री करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण केली आहे. तसेच सामूहिक शेतीचा विस्तार करत नव्याने काही क्षेत्रावर हरितगृहे तयार केली जाणार आहेत.
गुलाब फुलांचे प्रकार
* टॉप सिक्रेट (लाल रंग)
* गोल्ड स्ट्राइक (पिवळा)
* अॅवलांच (पांढरा)
* ट्रॉपिकल अॅमेझॉन (नारंगी)