काँग्रेसचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
ठाकरे ट्रॉमा सेंटरमध्ये शस्त्रक्रियेनंतर रुग्णांना अंधत्व
जोगेश्वरीमधील हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा सेंटरमध्ये डोळ्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर रुग्णांना अंधत्व आल्याच्या प्रकरणावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. या प्रकरणास रुग्णालयातील अपुरी वैद्यकीय सेवा आणि डॉक्टरांचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. तसेच शिवसेनाप्रमुखांच्या नावाला साजेल अशी वैद्यकीय सेवा रुग्णालयात उपलब्ध करावी, असा टोला काँग्रेसने सत्ताधारी शिवसेनेला लगावला आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा सेंटरमध्ये सात रुग्णांच्या डोळ्यांवर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यापैकी पाच जणांना दृष्टी गमवावी लागल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी डॉक्टरांचा हलगर्जीपणा जबाबदार आहे.
त्याचबरोबर रुग्णालयातील वैद्यकीय सेवेकडे दुर्लक्ष असलेली सत्ताधारी शिवसेना आणि पालिका प्रशासनही तितकेच जबाबदार आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला.
या रुग्णालयातील अतिदक्षता विभागाची क्षमता ४० ते ४५ खाटांची आहे. मात्र तेथे १४ खाटा उपलब्ध आहेत. तसेच या रुग्णालयातील अपुऱ्या वैद्यकीय सेवेमुळे रुग्णांचे हाल होत आहेत. परिणामी, या परिसरातील रुग्णांना खासगी रुग्णालयांत धाव घ्यावी लागत असल्याचे रवी राजा यांनी सांगितले. सत्ताधारी शिवसेनेच्या आग्रहाखातर या रुग्णालयाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले.
शिवसेनाप्रमुखांच्या नावाला साजेशी वैद्यकीय सुविधा मात्र तेथे उपलब्ध करण्यात सत्ताधारी शिवसेना आणि प्रशासन अपुरे पडले आहेत. रुग्णांना आवश्यक ती वैद्यकीय सुविधा उपलब्ध केल्यास ती बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली ठरेल, असा टोलाही रवी राजा यांनी हाणला.
या रुग्णालयावरून काँग्रेस आक्रमक झाल्यामुळे बुधवारी होणारी स्थायी समितीची बैठक वादळी होण्याची चिन्हे आहेत. या बैठकीत शिवसेना विरुद्ध विरोधक असा सामना रंगण्याची शक्यता आहे.