पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांना सडेतोड उत्तर
- भूदल दिनी लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांचा इशारा
पाकिस्तानने प्रत्यक्ष ताबा रेषेवर दहशतवादी कारवाया करीत कुरापती काढणे सुरूच ठेवले तर सडेतोड उत्तर दिली जाईल व त्यांची मोठय़ा प्रमाणात हानी केली जाईल असा इशारा लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी दिला आहे.
भारताच्या पश्चिम सीमेवरील शेजारी देश असलेला पाकिस्तान दहशतवादास पाठिंबा देत आहे असे सांगून ते म्हणाले की, प्रत्यक्ष ताबा रेषेवर भारतीय लष्कराचे वर्चस्व राहील व आम्ही ते कायम ठेवणार आहोत. आमची दले शत्रूला सडेतोड उत्तर देण्यास समर्थ आहेत. त्यांनी जर काही कारवाया केल्या तर आम्ही ठोस कारवाई केल्याशिवाय राहणार नाही. जम्मू-काश्मीर सीमेवर आमचा नैतिक दबदबा राहिला आहे. आम्ही आतापर्यंत दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी त्यांना बरीच हानी पोहोचवली आहे. जम्मू-काश्मीरच्या लोकांना कुणी अशांत करण्याचा प्रयत्न करू नये. तेथील परिस्थिती बिघडवण्यात पाकिस्तानचा हात आहे. दहशतवाद्यांना त्या देशात प्रशिक्षण मिळत असून शस्त्रे व पैसाही पुरवला जात आहे. तो देश दहशतवादाचा पुरस्कार करीत आहे.
चीन सीमेवरील परिस्थितीवर त्यांनी सांगितले की, सध्या दोन्ही देशांच्या सैन्याला नवी मार्गदर्शक तत्त्वे घालून देण्यात आली आहेत. पूर्व सीमेवर शांतता राखण्याचे आमचे प्रयत्न आहेत पण आमचे सैन्य पूर्व सीमेचे रक्षण करताना कुठलीही तडजोड करणार नाहीत.
ईशान्येकडील परिस्थितीवर रावत म्हणाले की, तेथील परिस्थिती शांत असून लष्कर तेथे बंडखोर विरोधी मोहिमा राबवत आहे. लष्कराचे जवान व कुटुंबीय यांनी समाजमाध्यमे हाताळताना काळजी घ्यावी कारण त्यांचा वापर मूलतत्त्ववाद पसरवण्यासाठी केला जात आहे. नौदल, पायदळ व हवाई दल यांच्या माध्यमातून आम्ही कुठल्याही युद्धात किंवा कारवाईत निर्णायक विजय मिळवू यात शंका नाही.
लष्करात फेररचना व आधुनिकीकरण चालू आहे. आगामी काही वर्षांत देशापुढील सुरक्षा आव्हाने जटील होणार असून आपल्याला युद्धसज्जतेत काळाबरोबर रहावे लागणार आहे तरच आपण शत्रूचा पराभव करू शकतो. देशातील लोकांनी आमच्यावर जो विश्वास टाकला आहे तो आम्ही सार्थ ठरवू.
पाकिस्तानच्या गोळीबारात बीएसएफचा अधिकारी शहीद
जम्मू : पाकिस्तान रेंजर्सनी आंतरराष्ट्रीय सीमेवर केलेल्या गोळीबारामध्ये सीमा सुरक्षा दलाचा (बीएसएफ) एक साहाय्यक कमांण्डण्ट शहीद झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. पाकिस्तानच्या सैनिकांनी शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आणि राजौरी जिल्ह्य़ात गोळीबार केला, त्याला भारतीय जवानांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले. बीएसएफचे जवान सीमेवर गस्त घालत असताना पाकिस्तान रेंजर्सनी गोळीबार केला. गोळीबारामध्ये शहीद झालेल्या अधिकाऱ्याचे नाव विनय प्रसाद असे असून त्याला प्रथम गंभीररीत्या जखमी अवस्थेत लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तेथे ते शहीद झाले.