संशोधनपत्रिकांचा विश्लेषण विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/PuneUniversity-1.jpg)
विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (यूजीसी) संशोधनपत्रिकांच्या विश्लेषणाची जबाबदारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे देण्यात आली आहे. यूजीसीने विद्यापीठात ‘सेल फॉर जर्नल्स अॅनालिसिस’ची स्थापना केली असून, संशोधनपत्रिकांच्या विश्लेषणाचे हे एकमेव केंद्र आहे.
संशोधनपत्रिकांच्या गुणवत्तेबाबत, वाङ्मयचौर्य रोखण्याबाबत यूजीसी गांभीर्याने काम करत आहे. त्या दृष्टीने देशभरातील विविध संस्थांना एकत्र आणून अलीकडेच यूजीसीने केअर या महासंघाची स्थापना केली. या महासंघाच्या माध्यमातून संशोधनपत्रिकांची यादी जाहीर केली जाईल. त्यासाठीच विद्यापीठात सेल फॉर जर्नल्स अॅनालिसिस सुरू करण्यात आला आहे. हा विभाग केअर महासंघाच्या कार्यकारी समितीच्या मार्गदर्शनानुसार काम करेल.
संशोधनपत्रिकांच्या विश्लेषणाच्या कामात विद्यापीठाला अहमदाबादच्या इन्प्लिबनेटकडून सहकार्य मिळणार आहे. तर देशभरातील चार विभागांसाठी चार विद्यापीठांची केअर युनिव्हर्सिटी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यात उत्तर विभागासाठी दिल्लीचे जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, पश्चिम विभागासाठी बडोद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठ, दक्षिण विभागासाठी हैद्राबाद विद्यापीठ आणि पूर्व विभागासाठी आसाममधील तेजपूर विद्यापीठाची निवड करण्यात आली.
केअर यादीमध्ये चार प्रकारच्या संशोधनपत्रिकांचा समावेश असेल. त्यातील अ गटात विज्ञान, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, शेती, जैववैद्यक शास्त्र, ब गटात यूजीसीच्या सध्याच्या यादीतील विश्लेषण करून पात्र ठरलेल्या संशोधनपत्रिका, क गटात समाजशास्त्र, मानव्यविद्या, भाषा, भारतीय ज्ञान शाखा, तर ड गटात केअर विद्यापीठांनी पात्रतेनुसार समाविष्ट केलेल्या नव्या संशोधनपत्रिकांचा समावेश असेल.
मूलभूत माहिती, प्राथमिक निकष, अन्य निकष या नुसार संशोधनपत्रिकांचे विश्लेषण केले जाईल. ६ ते १० दरम्यान गुण मिळवणाऱ्या संशोधनपत्रिका केअर यादीत समाविष्ट केल्या जातील. ४ ते ५ गुण मिळवणाऱ्या संशोधनपत्रिकांना तीन वर्षांसाठी निरीक्षणाखाली ठेवून इमर्जिग लिस्ट मध्ये समाविष्ट केले जाईल.
– डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ