हुतात्मा मेजर नायर यांना भावपूर्ण निरोप
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/Untitled-3-29.jpg)
- पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीत लष्करी इतमामात अंत्यसंस्कार
‘अमर रहे.. मेजर शशी नायर अमर रहे’.. ‘भारत माता की जय’.. ‘हिंदुस्तान जिंदाबाद.. पाकिस्तान मुर्दाबाद’.. ‘वंदे मातरम’ अशा घोषणा देत हुतात्मा मेजर शशिधरन नायर यांना रविवारी भावपूर्ण निरोप देण्यात आला. मेजर नायर यांना सलाम करण्यासाठी हजारो पुणेकरांनी वैकुंठ स्मशानभूमीत गर्दी केली होती. नायर यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी घडवलेल्या स्फोटात शुक्रवारी (११ जानेवारी) हुतात्मा झालेल्या मेजर शशिधरन विजय नायर यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
खडकवासला येथील नायर यांच्या घरापासून सजवलेल्या ट्रकमधून त्यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली. अकराच्या सुमारास ही अंत्ययात्रा वैकुंठ स्मशानभूमीत पोहोचली. आजी-माजी लष्करी अधिकारी, पालकमंत्री गिरीश बापट यांनी पुष्पचक्र अर्पण केल्यानंतर मेजर नायर यांची आई लता, पत्नी तृप्ती, बहीण, अन्य नातेवाइक आणि मित्र परिवाराने साश्रूनयनांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.
पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, आमदार भीमराव तापकीर, अभय छाजेड, श्रीकांत शिरोळे, लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातील अधिकारी, तिन्ही संरक्षण दलांचे प्रतिनिधी, वरिष्ठ पोलिस अधिकारी, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मिलिंद तुंगार या वेळी उपस्थित होते.