२० जानेवारीला ९ तासांचा मेगाब्लॉक
मुंबई – मध्य रेल्वेवरील परळ स्थानकातून आता कल्याणच्या दिशेने १६ उपनगरी फेऱ्या लवकरच सुरू होणार आहेत. मात्र दादरहून सुटणाऱ्या या फेऱ्या परळकडे वळवल्याने दादरच्या प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
या परळ टर्मिनसचे काम अंतिम टप्प्यात असून जानेवारीपर्यंत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. त्यासाठी २० आणि २७ जानेवारी रोजी मेगाब्लॉक घेऊन परळ टर्मिनसची कामे पूर्ण केली जाणार आहेत. २० जानेवारी रोजी तब्बल नऊ तासांचा ब्लॉक होणार असून सुमारे १०० लोकल फेऱ्या रद्द केल्या जातील, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. २७ जानेवारीला पाच तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे. २० जानेवारी रोजी पुणे, नाशिकला जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाडय़ांच्या वेळापत्रकावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
गेल्या काही वर्षांत दादर स्थानकातील प्रवाशांचा भार वाढला आहे. त्याप्रमाणे उपनगरी गाडय़ांची संख्याही वाढली. परळ स्थानकातही हीच परिस्थिती झाली आहे. सरकारी, खासगी कार्यालये, रुग्णालये त्यामुळे परळ स्थानकातही मोठी वर्दळ असते. या स्थानकाच्या बाजूलाच पश्चिम रेल्वेचे एल्फिन्स्टन स्थानकही आहे. त्यामुळे एल्फिन्स्टन स्थानकात उतरून अनेक जण मध्य रेल्वेवरील परळमार्गे गाडय़ा पकडतात.
परळ स्थानकातूनही प्रवास सुकर व्हावा, यासाठी येथूनच उपनगरी गाडय़ा सोडण्याचा निर्णय रेल्वेने घेतला होता. त्यासाठी काही वर्षांपूर्वी परळ टर्मिनसची उभारणी सुरू झाली. या टर्मिनसमधील एक फलाट सहा महिन्यांपूर्वीच प्रवाशांच्या सेवेत आला आहे. आता पूर्वीचा एक क्रमांकाचा फलाट बंद करून तेथेच टर्मिनसचे अंतिम काम सुरू आहे.
परळ स्थानकातूनच ठाणे, डोंबिवली, कल्याणच्या दिशेने उपनगरी गाडय़ा सोडण्यात येणार आहेत. अशा १६ फेऱ्या सोडण्याचे नियोजन केले जात आहे. या फेऱ्या दादर स्थानकातून परळ स्थानकात वळत्या केल्या जातील. सध्या दादर स्थानकातून कल्याणच्या दिशेने ३२ फेऱ्या सोडल्या जातात. यातीलच १६ फेऱ्या परळ स्थानकातून सुटतील, अशी माहिती देण्यात आली. सध्या या वेळापत्रकावर काम सुरू आहे.