माजी आमदार विलास लांडेचा निर्धार ; विधानसभेसाठी दत्ताकाकांना देणार आधार

उद्या बारामतीत अजितदादासमोर होणार खलबते
पिंपरी ( महा ई न्यूज ) – स्वताःच्या स्वार्थासाठी वारंवार पक्ष बदलणे हे मला पटत नाही. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांचा शब्दप्रमाण मानुन पक्षाचे काम निष्ठेने आजपर्यंत करीत आलो आहे. सत्तेसाठी कधीच तडजोड न करता जनतेची सेवा प्रामाणिकपणे केली आहे. त्यामुळे प्रत्येकवेळी राजकारण न करता समाजसेवेचा वसा आम्ही घेतला आहे. भविष्यात भोसरी विधानसभा मतदार संघासाठी पक्ष जो आदेश देईल, त्याचे काम करणार, त्यामुळे उद्या विरोधी पक्षनेते दत्ताकाका सानेंना राष्ट्रवादीची उमेदवारी शरद पवार साहेबांनी दिली. तर डबल ढोलकी न वाजविता त्यांचे काम प्रामाणिकपणे करणार, अशी स्पष्ट भूमिका माजी आमदार विलास लांडे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
राजामाता जिजाऊ जयंतीनिमित्त भोजापुर सार्वजनिक वाचनालय आणि राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने 10 ते 12 जानेवारीपर्यंत तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन केल्याची माहिती त्यांनी दिली. त्यावेळी ते बोलत होते.
लांडे म्हणाले की, मुंबईतील राष्ट्रवादीच्या बैठकीत शिरुर लोकसभेसाठी मी पक्षाची उमेदवारी मागितली नव्हती, मी इच्छुक असल्याचे वृत्त निधार आहे. त्यावेळी मी इच्छुक असल्याच्या बातम्या तुम्हीच दिल्या होत्या. परंतू, शिरुर लोकसभा मतदार संघासाठी मी आमदार दिलीप वळसे-पाटील यांच्या नावाची शिफारस केली होती. त्यामुळे मी इच्छुक असण्याचा प्रश्नच उदभवत नाही. तसेच आमचं घरानं शरद पवार साहेबांना मानणारे आहे. स्वार्थापोटी कोणत्याही पक्षात जाणार नाही. आजपर्यंत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे काम निष्ठेने आणि प्रामाणिकपणे करीत आलो आहे. भविष्यात पक्ष जो आदेश देईल, त्या उमेदवारांचे काम करणार आहे. उद्या विधानसभेचे तिकीट दत्ताकाकांना दिले. तर त्याचेही काम करण्याची माझी तयारी आहे. असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.
दरम्यान, भोसरीतील प्रश्नांवर लांडे म्हणाले की, भोसरीतील अनधिकृत बांधकामांसह काही व्यावसायिकांना नोटीस देणे, ते पाडायला लावणे, एखाद्या बिल्डरांकडे त्यांच्या व्यावसायात भागिदारी मागणे, असे अनेक उद्योग सत्ताधारी पक्षातील लोक करु लागले आहेत. महापालिकेच्या मान्यता दिलेल्या भोसरीतील कित्येक रस्त्यांसह विविध कामांच्या निविदा जादा दराने काढल्या जात आहेत. त्यात त्यांची टक्केवारीही वाढली आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी पालिका विकायला काढल्याचे दिसत आहे. भविष्यात महापालिकेची अवस्था बिकट होवून कर्जबाजारी होण्याची शक्यता आहे. सत्ताधा-यांनी महानगरपालिका म्हणजे लूटुन खायाचा धंदा मांडल्याची खंत त्यांनी यावेळी बोलून दाखविली.
उद्या बारामती होस्टेलला अजितदादासमोर होणार खलबते
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या नगरसेवकांची उद्या (बुधवारी) दुपारी 12 सुमारास बैठक आयोजित केली आहे. त्या बैठकीला माजी आमदार विलास लांडे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांच्यासह अनेक नगरसेवक जाणार आहेत. त्या बैठकीत सत्ताधारी भाजपने महापालिकेत चालविलेल्या अनागोंदी कारभारासह पक्षातील विविध मुद्दावर चर्चा होणार आहे. त्यामुळे उद्या पुण्यातील बारामती होस्टेलवर अजितदादांच्या बैठकीत कोणती रणनिती आखणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





